मविआनं विधानसभेला २५ जागा मुस्लिमांना द्याव्यात; मौलाना आझाद विचार मंचाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:46 PM2024-08-05T17:46:06+5:302024-08-05T17:47:01+5:30
लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीला जास्तीत जागा जिंकून देण्यासाठी मुस्लीम समाजानं सिंहाचा वाटा उचलला असून येत्या विधानसभेत मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबई - राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत मविआतील कुठल्याही पक्षाने मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मुस्लीम विरहित विधान परिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आली त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत. राज्यात किमान ३५ ठिकाणी मुस्लीम बहुल भाग असून त्यापैकी किमान २५ जागा महाविकास आघाडीने मुस्लीम समाजाला द्याव्यात अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचाने केली आहे.
या मंचाचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी म्हटलंय की, गेल्या १० वर्षात भाजपा प्रणीत मोदी सरकारने देशपातळीवर मुस्लीम आणि मागासवर्गीयांच्या विरोधात संविधान विरोधी कृती कार्यक्रम आखलेला होता. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करून मुस्लीम समाजाची प्रतिमा मलीन केली व त्याच बरोबर हिंदू- मुस्लीम तेढ निर्माण करीत मतांचे ध्रुवीकरण करून राजकीय लाभ उठविला. देशात २०१४ ते २०२४ पर्यंत मुस्लीम व दलितांचे १७७ झुंड बळीने खून करण्यात आले. गेल्या ३ महिन्यात साधारण ८-१० घटना झुंड बळीच्या झालेल्या आहेत. एकंदरीत या सर्व परिस्थितीचे आकलन व्यवस्थितपणे मुस्लीम समाजाला झाले. देशभरात इंडिया व महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या पाठीमागे लोकसभा निवडणुकीत धार्मिक गट, बिरादरी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांची एकत्रित मुठ बांधून प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडीला निवडून आणण्यामध्ये मुस्लिमांनी सिहांचा वाटा उचलला असं त्यांनी सांगितले.
तसेच टप्प्या टप्प्याने आघाडीतील घटक पक्षाने एकत्रितपणे विधानपरिषदेच्या पर्याप्त जागाही मुस्लीम कार्यकर्त्यांना द्याव्यात. मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्तेतील वाटा, सन्मानजनक समानतेचा हक्क मिळणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाज महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा राहावा अशीच आमची भूमिका आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांच्या शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्टपणे आपल्या जाहिरनाम्यात आश्वासन देण्यात यावे अशीही प्रमुख मागणी मौलाना आझार विचार मंचाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, मुस्लीम समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न करावेत. या सर्व मागण्यांसाठी येत्या २५ ऑगस्टला मुंबई येथे मुस्लिमांची राज्यव्यापी विचारमंथन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी मुस्लिमांनी गट-तट, राजकीय पक्ष आणि संघटना बाजूला सारून उपस्थित राहावं असं आवाहनही काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केले आहे.