महाविकास आघाडी मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी देणार?; संजय राऊत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:53 AM2024-02-29T07:53:13+5:302024-02-29T07:53:50+5:30
मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं जरांगे पाटलांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर जरांगेंनीही वंचितचा हा मोठेपणा आहे असं म्हणत त्यांचे आभार मानले.
मुंबई - Manoj Jarange Patil ( Marathi News ) मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळलं आहे. मराठा आरक्षणावरून जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप करत त्यांना इशारा दिला. त्यानंतर सरकारनेही जरांगे विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे यांचा बोलविता धनी कोण? जालनातील दगडफेक आणि बीडमधील जाळपोळ या सर्व घटनांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत ठेवला. १५ ओबीसी उमेदवारांना तिकीट द्यावी असंही वंचितने म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सर्वमान्य उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने स्वीकार करावा असं वंचितच्या नेत्यांनी सांगितले. त्याचसोबत पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना उमेदवारी द्यावी असंही वंचितने म्हटलं आहे. मात्र जरांगेंच्या उमेदवारीचा प्रस्ताव नाही असं म्हणत संजय राऊतांनी ही चर्चा फेटाळली आहे.
महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलाय, त्यात ज्या मतदारसंघात त्यांनी काम केले त्याची यादी दिली. आम्हाला लोकशाही, संविधान वाचवणे हा आमचा अजेंडा आहे. आम्ही बैठकीत सविस्तर चर्चा केली. कोण कुठे जिंकेल यावर चर्चा झाली. जिंकणे हे महत्त्वाचे आहे. जागा कोण किती लढवेल हे महत्त्वाचे नाहीत. वंचित बहुजन आघाडी हादेखील महत्त्वाचा घटकपक्ष आहे. २७ जागांचा फॉर्म्युला वंचितने दिला नाही. ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्यावर चारही पक्ष मिळून चर्चा करतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागावाटपावर बोलतोय असं संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, राजकारण माझा अजेंडा नाही. मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे. गृहमंत्र्यांनी कितीही संकटे उभे केले तरी ते सहज पार केले. वंचित बहुजन आघाडीचा हा मोठेपणा आहे. प्रकाश आंबेडकर हे पहिल्यापासून आंदोलनाच्या पाठिशी आहेत. माझा सध्या अजेंडा आरक्षणाचा आहे. मराठा आरक्षण मी मिळवून राहणारच आहे. माझा मालक समाज आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.