राज्यात महाविकास आघाडीची नव्याने मोट बांधणार; एकत्र लढलाे तर वेगळे चित्र दिसेल - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:35 AM2023-05-14T09:35:00+5:302023-05-14T09:36:11+5:30
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो तर उद्याच्या निवडणुकीत ते चित्र दिसेल.
मुंबई : कर्नाटकातील विजयानंतर महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने पुढे सरसावले आहेत. लवकरच महाविकास आघाडीची एक बैठक बोलावली जाईल. मी स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, आम्ही एकत्र बसून पुढची आखणी आतापासूनच करावी, हा विचार माझ्या मनात आहे. त्याबाबत मी सर्वांशी बोलणार आहे, असे शरद पवार शनिवारी म्हणाले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो तर उद्याच्या निवडणुकीत ते चित्र दिसेल.
फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही -
अलीकडच्या काळात भाजपने जिथे त्यांचे राज्य नाही त्याठिकाणचे आमदार फोडून तेथील राज्य घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी ठिकठिकाणी वापरले. कर्नाटकातसुद्धा त्यांनी तीच अवस्था केली. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरून सरकार पाडण्याची नवीन पद्धत सुरू केली. मात्र, फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिली, असेही पवार म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून, त्याचे प्रतिबिंब कर्नाटक निवडणुकीतून दिसले आहे. महाराष्ट्रातही कर्नाटकप्रमाणे भाजपचा पराभव होईल.
- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
जनतेला विकास हवा आहे, देवा-धर्माच्या नावावर राजकारण नको आहे. देव-धर्म ही वैयक्तिक बाब आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर उपरवाले की लाठी में आवाज नहीं होती.
- अशोक चव्हाण, काँग्रेस नेते
एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, ठाकरे गट