"उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मविआनं ३१ जागा जिंकल्या, ठाकरेंनीच CM व्हावं ही लोकांची इच्छा"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:04 PM2024-06-27T13:04:24+5:302024-06-27T13:05:18+5:30
उद्धव ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करू शकतात असं सगळ्यांच नेत्यांना वाटतंय असं कौतुकही वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंचं केले.
मुंबई - विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून उद्धव ठाकरे विधान भवनात आल्यापासून जवळजवळ सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्यात. उद्धव ठाकरेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा लोकांची आहे असं विधान ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. त्यासोबत फडणवीस-ठाकरे भेटीवरही त्यांनी भाष्य केले.
वैभव नाईक म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी याआधीही राज्याचं नेतृत्व केले आहे. फडणवीस आणि ठाकरेंची भेट विधान भवनात होणं हे स्वाभाविक आहे. या भेटीत संवादही झाला. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सगळेच मान्य करायला लागले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा झाला आहे. दोन्ही नेत्यांची भेट सहजपणे झाली. एका भेटीमुळे काही विश्लेषण करायची गरज नाही. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व राज्याने स्वीकारले आहे हे मान्य करावे लागेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच ही भेट सार्वजनिक ठिकाणी झालेली आहे. लपून भेट नाही. अचानक झालेली भेट आहे. उद्धव ठाकरे हे सगळ्यासोबत दिलखुलास असतात. जे आहे ते स्पष्ट बोलण्याची भूमिका उद्धव ठाकरेंची काल, आज आणि उद्याही तीच असेल. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालणारे कार्यकर्ते आहोत. विधानभवनात आज मविआचे अभिनंदन सगळ्यांनी केले, त्याचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे होते त्यांचेही अभिनंदन केले असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिले, आजच्या भेटी सकारात्मक आणि आशादायी असण्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नेत्यांचे आणि लोकांचे लक्ष आहे. त्यामुळे यातून भेटी झाल्या आहेत असं सांगत या भेटीतून अन्य काही चर्चा करण्यात अर्थ नसल्याचं आमदार वैभव नाईकांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे भेट
महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेले कधीकाळचे मित्र देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे हे विधान भवनात एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. फडणवीस-ठाकरे हे विधान भवनाच्या लिफ्टजवळ एकत्रित आले. तिथून लिफ्टमधून दोन्ही नेते विधान परिषदेला गेले. मात्र या भेटीचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे-फडणवीस यांनी एकमेकांवर आक्रमक वार-पलटवार केले होते. त्यामुळे या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच झालेली दोन्ही नेत्यांची भेट चर्चेचा विषय बनली.