नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा; संपूर्ण मंत्रालयाचा होणार पुनर्विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 06:02 AM2024-08-14T06:02:42+5:302024-08-14T06:03:44+5:30

मंत्रालयाला २०१२ मध्ये लागलेल्या आगीनंतर पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला होता

Mahavista in the state on the lines of Central Vista in New Delhi The entire Mantralaya will be redeveloped | नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा; संपूर्ण मंत्रालयाचा होणार पुनर्विकास

नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा; संपूर्ण मंत्रालयाचा होणार पुनर्विकास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार असून त्याच्या आराखड्यासाठी राज्य सरकारने जागतिक निविदा काढल्या आहेत. त्यामुळे मंत्रालय पुनर्विकासाची संकल्पना मार्गी लागणार आहे.

मंत्रालयाला २०१२ मध्ये लागलेल्या आगीनंतर पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र प्रत्यक्षात काही झाले नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पुनर्विकासाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बांधकाम विभागाने ५ ऑगस्टला यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार, मंत्रालय, मंत्रालयाची विस्तारित इमारत, मंत्र्यांचे बंगले या परिसराचा पुनर्विकास करण्यात येईल. गेल्या वर्षी या विषयीच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती.

विधिमंडळासाठीही लवकरच निविदा मंत्रालय आणि विधिमंडळ परिसराच्या पुनर्विकासासाठी नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर महाव्हिस्टा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आता मंत्रालय पुनर्विकासासाठी निविदा काढली असली तरी फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार संपूर्ण विधानभवन परिसराचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याच्या आराखड्यासाठीही जागतिक निविदा काढण्यात येणार आहे.

या इमारतींचा होणार पुनर्विकास

मंत्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारत, आकाशवाणी, आमदार निवास, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले, महात्मा गांधी गार्डन, शासकीय निवासस्थाने.

Web Title: Mahavista in the state on the lines of Central Vista in New Delhi The entire Mantralaya will be redeveloped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.