Mahavitaran Employee Strike: वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका; अहमदनगरच्या काही भागात मध्यरात्रीपासून बत्ती गुल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:05 AM2023-01-04T10:05:41+5:302023-01-04T10:10:12+5:30
अखंडीत वीज वितरणाची हमी देणारे राज्य सरकार वीज पुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरले आहे.
अदानींच्या कंपनीने महाराष्ट्रात समांतर वीज वितरणासाठी अर्ज केल्याने खासगीकरणाला विरोध म्हणून महावितरणचे वीज कर्मचारी, अधिकारी आजपासून तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. याचा पहिला फटका बसला असून अहमदनगरमधील सावेडी उपनगर भागातील वीज पुरवठा मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. यामुळे पाणीपुरवठयात व्यत्यय आला आहे. अखंडीत वीज वितरणाची हमी देणारे राज्य सरकार वीज पुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरले आहे.
वीज वितरणाच्या खासगीकरणाला विरोध यासह ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, तळोजा व उरणमध्ये अदानी वीज कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी ४ जानेवारीपासून (मंगळवारी रात्री १२ वाजेपासून) राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांनी ७२ तासांचा संप पुकारला आहे.
राज्यभरातील वीज यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. संपात ३१ संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने देखील कंबर कसल्याचे सांगितले गेले होते. परंतू, मध्यरात्रापासून बंद पडलेला वीज पुरवठा काही महावितरणला सुरु करता आलेला नाहीय.
वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत. तर जनतेच्या मालकीचा वीज उद्योग टिकला पाहिजे. तो भांडवलदारांना विकता कामा नये. भांडवलदार नफा कमविण्याच्या उद्देशाने वीज वितरण क्षेत्रात येत आहेत, असा दावा महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने केला आहे.
तोडग्यासाठी आज बैठक
४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपात सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
वीज गेली तर काय कराल? टोल फ्री क्रमांक
१८००-२१२-३४३५
१८००-२३३-३४३५
/१९१२/ १९१२०