आदिवासींचा महावितरणवर मोर्चा
By Admin | Published: May 17, 2016 04:04 AM2016-05-17T04:04:01+5:302016-05-17T04:04:01+5:30
पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे
कळंबोली : पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे, तिथे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, भरमसाट वीज बिल आदी समस्यांमुळे आदिवासी त्रस्त आहेत. याविरोधात सोमवारी श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या भिंगारी कार्यालयावर मोर्चा काढून असंतोष व्यक्त केला. यावेळी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या - पाडे आहेत. बहुंताशी ठिकाणी आजही वीज पोहचली नसल्याने आदिवासी अंधारात चाचपडत आहेत. वारंवार मागणी करूनही त्यांना वीजजोडणी दिली जात नसल्याचा आरोप आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ज्या वाड्यांमध्ये वीज पोहोचली आहे, तिथे वारंवार भारनियमन करण्यात येत असल्याने वीज असून नसल्यासारखी आहे.
असे असले तरी त्यांना बिले मात्र वाढीव व भरमसाट पाठविले जात असल्याच्या अनेक तक्र ारी आहेत. वाढीव वीज बिल न भरल्यास, लागलीच वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचेही आदिवासींचे म्हणणे आहे. मौजे निताळी येथील खानचा बंगला या कातकरी वाडीकरिता वीजपुरवठा योजना २०१४ मध्येच मंजुरी झाली आहे. मात्र अद्यापही या ठिकाणी वीज पोहचलेली नाही. या संदर्भात गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी लवकरच काम सुरू करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते. हे आश्वासन हवेतच विरले असून अद्यापही वाडीवर दिवे लागले नाहीत.
आदिवासी वाडीवर जर मीटर रिडिंग घेवून वीजबिल पाठवले जात असेल तर अवास्तव वीज बिल येते कसे, असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला असून वाढीव बिल कमी न करता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. जास्त बिल कमी करून त्यांना वीज बिल भरण्याकरिता मुदतद्यावी, नवीन मीटर बसविण्याकरिता कमी शुल्क आकारले जावे, अशी मागणी सोमवारी मोर्चेकऱ्यांनी केली.
संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय गुरव, तालुकाध्यक्ष भीमा गोसावी, तालुका संघटक जानू कातकरी, योगिता दुर्गे, कचरू कातकरी, बाया कातकरी यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. (वार्ताहर)