वाढत्या महागाईत महावितरणचा ग्राहकांना शॉक, वीजबिलात होणार मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:09 AM2022-07-09T06:09:27+5:302022-07-09T06:10:11+5:30
इंधन समायोजन आकारात केली प्रचंड वाढ, ग्राहकांवर पडणार मोठा बोजा.
मुंबई : राज्यातील जनता वाढत्या महागाईने होरपळून निघत असतानाच आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने इंधन समायोजन आकारात प्रतियुनिट सरासरी एक रुपया वाढ केल्याने वीजबिल किमान ६५ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक झटका बसणार आहे. जूनपासून ऑक्टोबरपर्यंत इंधन समायोजन आकार वीज ग्राहकांच्या वीज बिलात लागू होईल.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत वीज खरेदीवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी वीज कंपन्यांच्या वीजबिलात ग्राहकांसाठी इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहे. इंधन समायोजन आकारात वाढ झाल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी ९२ पैसे, तर टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी ९० पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. दरम्यान, वीज ग्राहकांचा वीज युनिट वापराचा स्लॅब बदलल्यानंतर वीजबिलात वापरानुसार वाढ होणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या दरांनुसार वीजबिलामध्ये शुल्क आकारले जाईल. इंधन समायोजन आकार दर कमी करण्यासाठी टाटा पॉवर पुरेशा उपाययोजना करत आहे. वीज खरेदी खर्च कमी करण्याच्या दिशेने काम करत आहे.
टाटा पॉवर
अल्प-मुदतीच्या बाजारपेठेत विजेच्या खरेदी दरात अलीकडेच झालेल्या तीव्र वाढीमुळे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाद्वारे रितसर मंजूर केलेला इंधन समायोजन आकार आहे. वीज पुरवठ्याची किंमत आणखी कमी करण्यासाठी आम्ही अतिरिक्त उपाय करत आहोत. ज्यामुळे आमचे ग्राहक येत्या काही महिन्यांत इंधन समायोजन आकार कमी करण्याची अपेक्षा करू शकतात.
अदानी इलेक्ट्रिसिटी
इंधन समायोजन आकार म्हणजे वीज खरेदी खर्चातील वाढ आहे. ही वाढ वीज ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. जून महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. महावितरणच्या वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारामुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया अधिक मोजावा लागणार आहे. दर महिन्याला राज्यभरातील सर्व ग्राहक मिळून एक हजार कोटी रुपये मोजावे लागतील.
प्रताप होगाडे
अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर वाढला होता. विजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यामुळे या काळात वीज खरेदी करण्यात आली होती. काही वीज २० रुपये तर काही वीज १२ रुपये प्रति युनिटने घेतली होती. वीज खरेदीचा खर्च वाढल्याने इंधन समायोजन आकार वाढला आहे. इंधन समायोजन आकार हा प्रत्येक कंपनीचा वेगळा असतो.
अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ
असे वाढणार वीजबिल
० ते १०० युनिट : ६५ पैसे
१०१ ते ३०० युनिट : १.४५ रुपये
३०१ ते ५०० युनिट : २.०५ रुपये
५०१ युनिटवर : २.३५ रुपये
कशी होईल वाढ
सध्या नवे बिल
₹५०० ₹५८०
₹१,००० ₹१,२००
₹१,५०० ₹१,७००