महावितरणला ग्राहकमंचाचा झटका महावितरणची कारवाई बेकायदा असल्याचे मंचाचे निरीक्षण
By admin | Published: May 10, 2014 04:50 PM2014-05-10T16:50:56+5:302014-05-10T20:38:13+5:30
ग्राहकास नुकसानभरपाईसह आलेल्या खर्चापोटी १३ हजार रुपये सहा आठवड्यांत देण्याचा आदेश न्यायमंचाने महावितरणला दिला आहे.
पुणे : जागेच्या मालकीबाबत न्यायालयाऐवजी स्वत:च निर्णय घेऊन ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करणार्या महावितरणचे ग्राहक मंचाने फटकारले. महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्याची कारवाई बेकायदा असल्याचे निरीक्षण नोंदवत, याबद्दल ग्राहकास नुकसानभरपाईसह आलेल्या खर्चापोटी १३ हजार रुपये सहा आठवड्यांत देण्याचा आदेश न्यायमंचाने महावितरणला दिला आहे.
तुकाराम पांडुरंग भुवड (रा. पूरग्रस्त वसाहत, पवर्ती) यांनी तक्रार दिली होती. भुवड हे ५० वर्षापासून पर्वती येथे वास्तव्यास असून मागील १५ वर्षांपासून महावितरणचे ग्राहक आहेत. परंतु, महावितरणने पूवर्सूचना न देता त्यांचा घरगुती वीजपुरवठा खंडित केली. याबाबत त्यांनी महावितरणच्या पद्मावती उपविभागाकडे ११ जानेवारी २०१३ रोजी अर्ज केला, तरी त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दोन महिने वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, त्यांच्या मुलांचा अभ्यास आणि पत्नीच्या आजारावरही दुष्परिणाम झाला. अखेर भुवड यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
दुसरीकडे भुवड यांनी वीजपुरवठा खंडित केल्याची तक्रार मार्केट यार्ड विभागाकडे न देता पद्मावती विभागाकडे दिली आणि त्यांचा शशिधर किसन तापकीर यांच्याशी जागेच्या मालकीबाबत वाद आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणने ग्राहक मंचात सांगितले. परंतु, जागेच्या वादाबाबत न्यायालयाच्या आदेशाशिवाय वीजपुरवठा खंडित करणे बेकायदा असल्याचे निरीक्षण ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्या गीता घाटगे यांनी नोंदविले आहे. तसेच, भुवड यांना पद्मावती विभागाकडून वीजबिल येत असल्याने मार्केट यार्ड उपविभागात तक्रार करावयास हवी, हे महावितरणचे म्हणणे तथ्यहीन असल्याचे न्यायमंचाने निकालात नमूद केले आहे.
त्यामुळे महावितरणने तक्रारदार यांना वीज पुरवठा खंडीत कल्यामुळे शाररिक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्याच्या नुकसानभरपाईसाठी १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चासाठी ३ रूपये देण्याचा आदेश मंचाने दिला.