39 हजार कोटींच्या थकबाकीने महावितरणची आर्थिक कोंडी, राज्यभरात थकबाकी वसुलीची मोहीम जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 07:50 PM2018-03-20T19:50:05+5:302018-03-20T19:50:05+5:30

राज्यात सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे 39 हजार कोटी रुपयांची वीजबिले थकीत असल्याने महावितरणची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे.

MahaVitaran's economic stutter, outstanding recovery of Rs 39,000 crores in the state | 39 हजार कोटींच्या थकबाकीने महावितरणची आर्थिक कोंडी, राज्यभरात थकबाकी वसुलीची मोहीम जोरात

39 हजार कोटींच्या थकबाकीने महावितरणची आर्थिक कोंडी, राज्यभरात थकबाकी वसुलीची मोहीम जोरात

googlenewsNext

मुंबई- राज्यात सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे 39 हजार कोटी रुपयांची वीजबिले थकीत असल्याने महावितरणची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणकडून राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.  
महावितरणवर वाढत्या थकबाकीमुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या सुमारे १ कोटी 41 लाख ग्राहकांकडे जानेवारी 2018 अखेरीस एकूण थकबाकी 39 हजार कोटी एवढी आहे.  या थकबाकीत 57 लाख 56 हजार घरगुती ग्राहकांकडे सुमारे 1 हजार 500 कोटी,  5 लाख 73 हजार वाणिज्यिक  ग्राहकांकडे सुमारे 478 कोटी,  1 लाख 5 हजार उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे 847 कोटी,  41 हजार सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे  सुमारे 1 हजार 500 कोटी, 79 हजार पथदिवे ग्राहकांकडे सुमारे 3 हजार 300 कोटी,  38 लाख कृषी ग्राहकांकडे सुमारे 23 हजार कोटी, 45 हजार 219 यंत्रमाग ग्राहकांकडे सुमारे 938 कोटी, 57 हजार इतर ग्राहकांकडे सुमारे 79 कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच राज्यात 3 लाख 57 हजार कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांकडे 7 हजार  कोटी रुपयांची थकबाकी आहे. 
महावितरणचा उद्देश नफा कमावणे नसून ग्राहकांना सुरळीत सेवा देणे हा आहे. परंतु वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीची होत असलेली आर्थिक कोंडी पाहता थकीत वीजबिलांची वसुली अत्यावश्यक झाली आहे. प्रत्येक महिन्यातील ग्राहकांकडून येणाऱ्या महसूलापैकी सुमारे 85 ते 90 टक्के खर्च वीज खरेदीवर होत आहे. परंतु प्रत्येक महिन्यात बरेच ग्राहक वीजबील भरत नसल्याने वीज खरेदीकरिता लागणारी आवश्यक रक्कमसुध्दा महावितरणकडे जमा होत नाही. वीज खरेदीमध्ये उधारीचे दिवस संपल्याने चालू वीजबिलांसह थकबाकीची 100 टक्के वसुली करणे आवश्यक झाले आहे. वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी राज्य शासन व महावितरणकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु वारंवार विनंती करूनही वीजग्राहकांनी या योजनांना अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. या सर्व पर्यायानंतर महावितरणने थकबाकी वसुलीसाठी आता थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आहे. 
ग्राहकांना वीजबिलासंदर्भात तक्रारी असल्यास प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करावे अशा सूचना मुख्यालयातून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. थकीत वीजबील भरण्यासाठी राज्यभरातील स्थानिक वीजबील भरणा केंद्रे तसेच घरबसल्या 'ऑनलाईन' पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ॲप असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.  त्यामुळे ग्राहकांनी आपल्या थकबाकीचा भरणा त्वरीत करावा व आपला वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
 

Web Title: MahaVitaran's economic stutter, outstanding recovery of Rs 39,000 crores in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.