"राज्यात महायुती 48 विरुद्ध 0, हेच चित्र पाहायला मिळेल", तानाजी सावंतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 02:08 PM2024-03-01T14:08:57+5:302024-03-01T14:10:58+5:30
Tanaji Sawant : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सर्वच जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास तानाजी सावंत व्यक्त केला आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. यासाठी सर्वच पक्षांमध्ये जागावाटाबाबत चर्चा सुरु झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवार जाहीर केले नाहीत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सर्वच जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास शिवेसना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व्यक्त केला आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे गुरुवारी (29 फेब्रुवारी) भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीच्या वेगवेगळ्या सर्व्हेक्षणामध्ये 42, 45, 40 अशा काही लोकसभेच्या जागा महायुतीला मिळणार असल्याचे सांगितले जाते. पण ते काही खरे नाही. यवतमाळ येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ,'आपकी बार, चारसो पार'. तर मी म्हणेन महाराष्ट्रात 'महायुती 48 विरुद्ध शून्य'. हेच महाराष्ट्रातून चित्र देशाला पाहायला मिळेल, असे दावा तानाजी सावंत यांनी केले आहे.
तानाजी सावंत म्हणाले, केंद्र सरकार सोबत विकास कसा असतो, हे जनतेने पाहिलं आहे. कारण केंद्राच्या मदतीशिवाय विकास होणे अशक्य आहे. ज्या ठिकाणी हजारो कोटीचा निधी लागेल त्या ठिकाणी केंद्र सरकार अगदी हिमालयाप्रमाणे आपल्या पाठीशी उभे राहते. विरोधाला विरोध किंवा विकासाला विरोध ही सर्वसामान्य जनता खपवून घेत नाही. गेल्या 40 ते 50 वर्षापासून ज्यांनी महाराष्ट्र आणि देश मातीत घालण्याचे ध्येय ठेवले होते, त्यांना भारतातील 140 कोटी जनतेने झुगारून टाकलेले आहे, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.
याचबरोबर, जनतेने नरेंद्र मोदींना विकास पुरुष, विश्वनेता बनवलं आहे. हे नेतृत्व भारतातील जनता कधीही सोडणार नाही. मागील सात पिढ्याला लागलेलं दारिद्र्य घालवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान करायचे आहे, असेही तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, या कार्यक्रमास भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके, आरपीआयचे संजय बनसोडे उपस्थित होते.