"महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:34 IST2024-10-09T15:32:19+5:302024-10-09T15:34:47+5:30
Jayant Patil News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. याचसंदर्भात महायुती सरकारने एक कंत्राट काढले आहे, त्यावर जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला आहे.

"महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
Jayant Patil Mahayuti: महाराष्ट्रात लवकरच निवडणूक होत आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. दोन्ही आघाड्यांकडून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरत आहेत. तर महायुतीकडून सरकारी योजनांच्या जाहिरातीवर भर दिला जात आहे. सरकारने आता यासाठी कंत्राट काढले असून, यावरून जयंत पाटलांनी लक्ष्य केले आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचे लक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रात वेगळे लागले. महायुतीला जबर फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी महायुती जोरात प्रयत्न करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे महायुतीने विविध योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केल्या. या योजनांच्या माध्यमातून महायुती प्रचार करताना दिसत आहे.
या योजनांबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता महायुती सरकारने योजनांच्या प्रसिद्धीसाठी कंत्राट काढले आहे. ९० कोटींचे हे कंत्राट असून, त्यावर जयंत पाटलांनी टीका केली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
"फक्त काही दिवसांकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने 90 कोटी रुपयांचे टेंडर काढलेले आहे. आतापर्यंत या सरकारने जवळपास दीड हजार कोटी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च केले आहे. या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती", असे जयंत पाटील या कंत्राटाबद्दल म्हणाले.
फक्त काही दिवसांकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढलेले आहे. आतापर्यंत या सरकारने जवळपास दीड हजार कोटी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च केले आहे. या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती, माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला… pic.twitter.com/wrfbrNIe1y
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 9, 2024
"माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला असता. माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळाले असते. ग्रामीण, आदिवासी भागातील किती रस्ते झाले असते. विचार करा या पैशांमध्ये किती लाडक्या बहिणींना मदत झाली असती, पण शेवटी महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे.