महेश आहेर यांच्याकडील कार्यभार काढून चौकशी, उद्याेगमंत्री उदय सामंत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 07:29 AM2023-03-22T07:29:33+5:302023-03-22T07:29:44+5:30
मुख्यमंत्र्यांना दारूच्या नशेत फोन करण्याची हिंमत करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांकडून करण्यात आली.
मुंबई : ठाण्यातील राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीसह त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणारे टीएमसी सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर ५०० घरे बळकावल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांना दारूच्या नशेत फोन करण्याची हिंमत करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांकडून करण्यात आली. यावर संबंधित अधिकाऱ्याचे अधिकार काढून घेऊन चौकशी केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेत आमदार विलास पोतनीस यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांकडून आणि फेरीवाल्यांकडून दररोज लाखो रुपयांचे वसुली करत असून याबाबतच्या चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणातील चित्रफितींची सत्यता तपासून या अधिकाऱ्याला बडतर्फ करणार का, असा सवाल पोतनीस यांनी केला. त्यावर सामंत यांनी एसआयटी चौकशीत असा टीएमसीचा एकही अधिकारी नाही, असा अहवाल आहे, अशी माहिती दिली. तेव्हा अनिल परब यांनी अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणी निवेदन द्यावे, अशी मागणी केली. या अधिकाऱ्याची ३० दिवसांच्या आत सविस्तर चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत त्याचा कार्यभार काढून घेतला जाईल, अशी घोषणा सामंत यांनी केली.
उपसभापतींचे मौन, सदस्यांची विनवणी
सीआयडी चौकशी सुरू असताना त्या व्यक्तीला पदावरून हटविले जात नाही हा काय प्रकार आहे, असा प्रश्न उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला.
चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी अधिकाऱ्याला निलंबित करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे बोलण्याची संधी मिळत नसल्याने संतप्त झाले होते.
त्यावर उपसभापती गोऱ्हे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मी काही न बोलता लक्षवेधी होईपर्यंत मौन पाळते असे जाहीर केले.
त्यामुळे महाविकास आघाडीचे आमदार चांगलेच कोंडीत सापडले. अखेर माफी मागतो, असे परब म्हणाले.
तर भविष्यात सभागृहात असे काही घडणार नाही, असे शिंदे म्हणाले आणि विषयावर पडदा पडला.