माटुंगा स्थानकात ‘महिलाराज’
By admin | Published: June 3, 2017 03:32 AM2017-06-03T03:32:30+5:302017-06-03T03:32:30+5:30
देशात महिला सक्षमीकरणाबाबतच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल सुरू आहेत. मात्र मध्य रेल्वेने प्रत्यक्ष कृतीमधून महिला सक्षमीकरणाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात महिला सक्षमीकरणाबाबतच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल सुरू आहेत. मात्र मध्य रेल्वेने प्रत्यक्ष कृतीमधून महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा घातला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानकाच्या सुरक्षेसाठीही रेल्वे सुरक्षा बलाच्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात ४ फलाट आहेत. माटुंगा स्थानकातील सर्व कामकाज ३० महिला अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे चालवत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ बुकिंग क्लार्क, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ कर्मचारी यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ५ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली.
महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीने नेहमी अत्याधुनिक प्रयोग करण्यात येतात. त्या धर्तीवर माटुंगा स्थानक महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांकडूनदेखील या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माटुंगा स्थानकाप्रमाणे भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वे आणखी प्रयत्न
करणार आहे, असे मध्य रेल्वेचे नवनियुक्त मुख्य जनसंपर्क
अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या महिला सक्षमीकरणाचा इतिहास
पहिली महिला महाव्यवस्थापक सौम्या राघवन (१९७३ बॅच रेल्वे आॅफिसर) या मध्य रेल्वेवर महाव्यवस्थापकीय म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. २००७ साली व्ही.के. कौल यांच्या जागी राघवन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पहिली महिला स्टेशन मास्टर
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात १९ मे १९९२ रोजी ममता कुलकर्णी यांची साहाय्यक स्टेशन मास्तर पदी नियुक्ती करण्यात आली होती. कुलकर्णी या पहिल्या स्टेशन मास्तर म्हणून ओळखल्या जातात.
पहिली महिला गार्ड
श्वेता गोने यांच्यावर वयाच्या २२व्या वर्षी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल्वे गार्ड ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. वाणिज्य शाखेत पदवीधर असणाऱ्या श्वेता यांनी यशस्वीपणे मालगाडी गार्डची भूमिका पार पाडली आहे.