एका मताने येणार महिलाराज
By admin | Published: October 8, 2016 04:22 AM2016-10-08T04:22:23+5:302016-10-08T04:22:23+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १३१ प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली.
ठाणे : पुढील वर्षी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १३१ प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. त्यामध्ये नगरसेविकांची संख्या नगरसेवकांच्या तुलनेत एकाने जास्त म्हणजे ६६ नगरसेविका तर ६५ नगरसेवक अशी असणार आहे. त्यामुळे नव्या महापालिका सभागृहात एका मताने ‘महिलाराज’ येणार आहे.
मागील निवडणुकीच्या तुलनेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागा ४ ने वाढल्या असून ओबीसींच्या आरक्षणातही एकाने भर पडली आहे. खुल्या प्रवर्गातून ८४ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब, निवडणूक निर्णय अधिकारी ओमप्रकाश दिवटे आदींच्या उपस्थितीत शाळकरी मुलांच्या हातून ही सोडत काढण्यात आली. नव्या प्रभाग रचनेनुसार ३३ बहुसदस्यीय प्रभाग झाले असून अ, ब, क, ड असे मिळून चारचा एक प्रभाग तयार झाला आहे. या बहुसदस्यीय प्रभागातून तब्बल १३१ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. लोकसंख्या वाढीचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दिवा परिसरातून यंदा तीन पॅनलमधून तब्बल ११ नगरसेवक निवडून जाणार आहेत. शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जुन्या ठाण्यातून २० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील जागा वाढल्या असून जुन्या ठाण्यातील जागा कमी झाल्या आहेत. घोडबंदर परिसरातील जागाही काही प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहता, या भागातील फेररचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
>आरक्षण किती व कसे? पालिकेवर एकूण १३१ नगरेसवक निवडून जाणार असून त्यामध्ये पुरुष ६५ तर स्त्रीया ६६ असतील. अनुसूचित जातीमधील ९ नगरसेवक तर अनुसूचित जमातीमधील नगरसेवक ३ असतील. मागास प्रवर्ग (ओबीसी) नगरसेवकांची संख्या ३५होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून ८४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. एकूण ६६ जागा या महिलांसाठी आरक्षित असून यामध्ये अनुसूचित जातीच्या ५, अनुसूचित जमातीच्या २, नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गामधील १८ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून ४१ महिलांचा समावेश असेल.