सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2024 02:10 PM2024-11-24T14:10:27+5:302024-11-24T14:53:36+5:30
Mahim Assembly Election 2024 Result Live Updates: माहिम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यातील लढतीत तुलनेने दुबळे उमेदवार समजले गेलेले महेश सावंत हे सर्वार्थाने बलाढ्य असलेल्या दोन उमेदवारांना पराभूत करत खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले. माहिमच्या लढतीत महेश सावंत यांनी बाजी कशी पलटवली, त्यांच्या विजयात नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. यांचा आपण आज आढावा घेऊयात.
- बाळकृष्ण परब
राज्यातील अत्यंत लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकालाची नोंद झालीय. माहिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यामध्ये झालेल्या तिरंगी लढतीत महेश सावंत यांनी सनसनाटी विजय मिळवलाय. माहिम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यातील लढतीत तुलनेने दुबळे उमेदवार समजले गेलेले महेश सावंत हे सर्वार्थाने बलाढ्य असलेल्या दोन उमेदवारांना पराभूत करत खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले. माहिमच्या लढतीत महेश सावंत यांनी बाजी कशी पलटवली, त्यांच्या विजयात नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. यांचा आपण आज आढावा घेऊयात.
महेश सावंत हे तसे सामान्य शिवसैनिक. सुरवातीच्या काळात सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी काम केलं होतं. तेव्हापासून मजल दरमजल करत त्यांनी मजल दरमजल करत विभागप्रमुख पदापर्यंत झेप घेतली होती. दरम्यानच्या काळात २०१७ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणू लढवली होती. तसेच उत्तम जनसंपर्क आणि समाज कार्याच्या जोरावर त्यांना कडवी टक्करही दिली होती. पुढे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. तसेच विभागप्रमुखपद सांभाळत असताना माहिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद त्यांनी कमी होऊ दिली नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून शिवसेना ठाकरे गटाला मिळालेल्या सुमारे ५५ हजार मतांमधून हे दिसून आले होते. हीच बाब विधानसभेत झालेल्या तिरंगी लढतीत महेश सावंत यांच्यासाठी फायदेशीर ठरली.
महेश सावंत यांच्या विजयात महत्त्वाची ठरलेली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि राबवलेली प्रभावी प्रचार मोहीम. महेश सावंत यांचा पिंड हा सर्वसामान्यांना मदतीसाठी वेळी अवेळी धावून येणाऱ्या कार्यकर्त्याचा राहिलाय. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत बऱ्यापैकी झाला. ‘’तुम्हाला राजपुत्र आमदार हवा, धनवान आमदार हवा की सर्वसामान्य कार्यकर्ता हवा’’ अशी टॅगलाइन घेऊन त्यांनी प्रचार सुरू केला होता. तसेच मोठ्या नेत्यांच्या सभांऐवजी वैयक्तिक जनसंपर्कावर भर दिला. ही बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. त्याबरोबरच महेश सावंत कोकणातील असल्याने आपल्या गावातील उमेदवार म्हणून या भागातील बरेच लोक पक्ष विसरून त्यांच्या मागे उभे राहिल्याचं दिसून आलं.
याबरोबरच माहिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मनसे आणि शिवसेना शिंदे गटामध्ये झालेला गोंधळही महेश सावंत यांच्या पथ्यावर पडला. येथील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानामधून हे दिसून आले. लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहायची झाल्यास माहिम विधानसभा मतदारसंघ ज्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात येतो तिथे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लढत झाली होती. तर मनसेचाही महायुतीला बिनशर्त पाठिंबा होता. या लढतीत माहिममधून शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना १३ हजार ९९० मतांची आघाडी मिळाली होती. मतांचा विचार करायचा झाल्यास शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांना ६९ हजार ४८८, तर ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना ५५ हजार ४९८ मतं मिळाली होती. त्यामुळे महायुतीला मिळालेल्या मतांमध्ये मनसेच्या मतांचाही ठराविक वाटा होता. मात्र विधानसभेला मनसे आणि शिंदे गट स्वतंत्र लढले. तर महाविकास आघाडी ठाकरे गटासोबत एकत्रित राहिली. त्यामुळे ठाकरे गटाच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता मावळली होती. आता निकालांनंतर माहिममध्ये ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना ५० हजार २१३, शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांना ४८ हजार ८९७ तर मनसेच्या अमित ठाकरेंना ३३ हजार ६२ मतं मिळाल्याचं समोर आलं. याचा अर्थ ठाकरे गट आपली मतं ही बऱ्यापैकी एकजूट ठेवण्यात यशस्वी ठरला. तर मनसे आणि शिंदे गटामधील वादात मतविभागणी झाली आणि त्याचा फायदा ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांना झाला.