याकूब निष्पाप असल्याची माहीमकरांची भावना
By admin | Published: July 26, 2015 02:36 AM2015-07-26T02:36:35+5:302015-07-26T02:36:35+5:30
हमारे दिल मे किसी भी धर्म के लिये नफरत नही है. चाहे वो हिंदू हो या ईसाइ. हम हिंदूपर भरोसा कर सकते है, लेकीन पुलीसवालों पे हमे जराभी भरौसा नही. दंगो मे पुलीसने हमे सबसे ज्यादा जलील किया.
- जयेश शिरसाट, मुंबई
हमारे दिल मे किसी भी धर्म के लिये नफरत नही है. चाहे वो हिंदू हो या ईसाइ. हम हिंदूपर भरोसा कर सकते है, लेकीन पुलीसवालों पे हमे जराभी भरौसा नही. दंगो मे पुलीसने हमे सबसे ज्यादा जलील किया. क्यो पता नही लेकीन दंगो मे पुलीस एकतर्फा थी. मिलीटरी भी मोहल्लो मे घुमती थी. पुलीस के इस रवैयेसे बम्बकांड का महौल बना. असल मे पुलीसही बम्बकांड की जीम्मेवार है... माहीमच्या गल्लीबोळात कोणालाही विचारा प्रत्येकाची प्रतिक्रिया अशीच आहे. वरकरणी माहीम शांत असल्याचे दिसत असले तरी सध्या प्रत्येक जण याकूबच्या फाशीचीच चर्चा करताना दिसतो आहे.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकूब, बॉम्बस्फोटांचा मास्टरमार्इंड टायगरसह संपूर्ण मेमन कुटुंब माहीममध्ये वास्तव्यास होते. दंगलींमध्ये विशेषत: पोलिसांकडून झालेल्या (तथाकथित) अत्याचारांचा बदला बॉम्बस्फोट घडवून घेतला गेला, अशी भावना येथील जनतेत आहे. आणि त्यामुळेच इथे मेमन कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर सहानुभूती असल्याचे जाणवले. याकूबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने माहीममध्ये अनेकांशी चर्चा केली, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यातून याकूब निरपराध होता, त्याला देण्यात आलेली फाशीची शिक्षा चुकीची असल्याची भावना व्यक्त झाली. याकूबची फाशी टळावी असे अनेकांना वाटते. त्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करीत आहे. दंगल सुरू असतानाच माहीमच्या प्रसिद्ध मग्दुमशा दर्ग्याच्या प्रवेशद्वाराजवळ जमलेल्या जमावासमोर टायगरने केलेली घोषणा आजही इथल्या लोकांच्या मनात घर करून असल्याचे दिसले. अल्ला जरूर इन्साफ करेगा. अभी कुछ करना ठीक नही. सही वक्त आने पर हम इसका बदला जरूर लेंगे... टायगरच्या या वक्तव्याचे गांभीर्य आम्हाला बॉम्बस्फोटांनंतर लक्षात आले, एक बुजुर्ग रहिवासी सांगत होते.
याकूबला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हापासूनच आम्ही दु:खी आहोत. भविष्यात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर फक्त दु:ख व्यक्त करू. राग व्यक्त नाही करणार कारण आम्ही न्यायालयाचा निकाल मान्य केलाय. पण आमचे टायगरबाबतचे मत मात्र पूर्णपणे भिन्न आहे. आम्हाला त्याच्याबद्दल जराही सहानुभूती नाही. कारण तो गुन्हेगार होता आणि आहे, अशीही एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली.
गाजावाजा नको
जर याकूबला फाशी झाली आणि त्याचा मृतदेह मुंबईत माहीममध्ये आलाच तर त्याच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने जमाव गोळा होईल. आझाद मैदान दंगलीतही बाहेरच्यांनी येऊन गोंधळ घातला होता. याकूबच्या अंत्ययात्रेतही त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे झाले तर दोष माहीमकरांचा नसेल. कारण इथल्या प्रत्येकाला काय घडले, घडतेय याची पूर्ण कल्पना आहे. आम्हाला शांतता हवी आहे. त्यामुळे मेमन कुटुंबीयांकडून याकूबच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार शांततेत व्हावेत, अशी इच्छा व्यक्त होत आहे.
चर्चा चांदीची शिडी, सोन्याच्या रेलिंगची
बॉम्बस्फोटांनंतर पोलिसांनी जेव्हा अल-हुसैनीमधील टायगरचे घर उघडले तेव्हा एक पोलीस शिपाई चक्कर येऊन पडला. का तर त्या घरात कोट्यवधींची रोकड आणि त्याहीपेक्षा जास्त किमतीचे सोने होते. पुढे या मालमत्तेचे काय झाले माहीत नाही, अशा चर्चा माहीममध्ये सुरू आहेत. त्यातही विशेष चर्चा म्हणजे टायगरच्या अल-हुसैनीमधील ड्युप्लेक्स फ्लॅटमधील जिने किंवा शिड्या चांदीच्या होत्या आणि त्याची रेलींग सोन्याची. तूर्तास मेमन कुटुंबाचे फ्लॅटना सीबीआयने सील ठोकले आहे.
खटल्यातील काही आरोपी माहीममध्ये
बॉम्बस्फोट खटल्यातील काही आरोपी पॅरोलवर सध्या माहीममध्ये परतले आहेत. माहीमच्या गल्लीबोळांत फिरताना हे आरोपी सहजपणे दिसतात. जुन्या मित्रांच्या गराड्यात बसून तेही सध्या याकूबच्या फाशीचे काय होते याकडे नजर ठेवून आहेत.