कारागृह अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा
By admin | Published: September 2, 2016 01:52 AM2016-09-02T01:52:27+5:302016-09-02T01:52:27+5:30
ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत, त्याच कारागृहातील एका महिला कॉन्स्टेबलने तक्रार केली आहे.
ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत, त्याच कारागृहातील एका महिला कॉन्स्टेबलने तक्रार केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून अद्यापही त्यांना अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्या दोघांमधील मोबाइलवरील झालेले संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादग्रस्त कारागृह अधीक्षक जाधव हे पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन राज्याचे कारागृह महानिरीक्षकराजवंत सिन्हा यांनी चौकशीला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक म्हणून जाधव २०१६ च्या फेब्रुवारीत रुजू झाले. त्यांनी त्याच कारागृहातील महिला कॉन्स्टेबलला कामाचा बहाणा करून २६ आॅगस्ट रोजी रात्री कळवा ब्रिजजवळ बोलवून हात जबरदस्तीने पकडला. तसेच २९ आॅगस्ट रोजी रात्री १.३० वाजता मोबाइलवर वारंवार मेसेज करून भेटण्याचा आग्रह केला. तर, व्हॉट्सअॅपवर तिचेच फोटो तिला पाठवून त्रास दिल्याचा आरोप त्या महिलेने तक्रारीत केला आहे. जाधव यांचा मोबाइल बंद असल्याने संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)
- या प्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही कोणालाही अटक केली नसून चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही.एच. शिंदे करीत आहेत.