अमराठींसाठी ‘मायमराठी’ प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:17 AM2018-04-02T05:17:05+5:302018-04-02T05:17:05+5:30
अमराठी भाषिक लोकांना शास्त्रशुद्ध परंतु सोप्या भाषेत मराठी शिकविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने प्रकल्प चालविण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या माध्यमातून जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकता येईल, असे परिपूर्ण साहित्य या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात येणार आहे.
मुंबई : अमराठी भाषिक लोकांना शास्त्रशुद्ध परंतु सोप्या भाषेत मराठी शिकविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने प्रकल्प चालविण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाच्या माध्यमातून जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकता येईल, असे परिपूर्ण साहित्य या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात येणार आहे.
गेल्या १०० वर्षांत जर्मन भाषा अध्यापनाच्या क्षेत्रात प्रचंड संशोधन आणि विकास झालेला आहे. जर्मन माहीत नसणाऱ्या लोकांपर्यंत जर्मन भाषा पोहोचविण्यासाठी एकात्मिक संवादात्मक पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्यंत प्रगत अशी पद्धती निर्माण करण्यात आली. याच पद्धतीचा वापर करत मराठी भाषेच्या प्रसारासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाने अध्यापन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञांच्या सहकार्याने अमराठी लोकांपर्यंत मराठी पोहोचविण्यासाठी ‘मायमराठी’ या नावाने कार्यक्रम सुरू केला आहे.
याअंतर्गत एक ते सहा पातळ्यांवर अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभाग यांच्यामध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक झालेल्या अमराठी भाषिकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मराठी भाषा शिकवण्यासाठी अभ्यासक्रम उपलब्ध नाही. याबाबत आजवर विविध संस्थांनी प्रयोग केलेले आहेत. मात्र त्यात कालानुरूप बदल होणे गरजेचे होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाचा प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेला प्राप्त झाल्यावर या प्रस्तावाचा सांगोपांग विचार करूनच ‘मायमराठी’ हा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.