मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक
By admin | Published: July 14, 2015 11:54 PM2015-07-14T23:54:33+5:302015-07-15T00:44:48+5:30
बनावट नोटा : आणखी एकाचे नाव निष्पन्न
सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. मुख्य सूत्रधार प्रवीण चिंतामणी कांबळे (वय ३५, रा. दुधगाव, ता. मिरज) व आप्पासाहेब कृष्णा घोरपडे (४६, दत्तवाड, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. अटकेतील संशयितांची संख्या दहा झाली आहे. याप्रकरणी आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फुलारी म्हणाले की, या प्रकरणात प्रवीण कांबळे मुख्य संशयित आहे. बनावट नोटांची छपाईची कल्पना त्याचीच आहे. त्याने यापूर्वी संगणकावर स्वत: एक हजाराच्या नोटेचे डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले नव्हते. आप्पासाहेब घोरपडे हा पतसंस्थेत बचत प्रतिनिधी आहे. प्रवीणने त्याच्या मदतीने बनावट नोटा चलनात आणण्याचा बेत आखला होता. यासाठी त्याला सहभागी करून घेतले होते. यापूर्वी अटक केलेला रमेश घोरपडे हा आप्पासाहेबचा भाऊ आहे. त्याच्याच घरात बनावट नोटा छपाईचा कारखाना उघडण्यात आला होता. (प्रतिनिधी)
पुण्यातून खरेदी
पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट म्हणाले की, बनावट नोटांची छपाई करण्यासाठी लागणारे रंगीत झेरॉक्स यंत्र, स्कॅनर, प्रिंटर, कागद ही सामग्री संशयितांनी पुण्यातून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. कटिंग यंत्र कोरेगाव (ता. वाळवा) येथून खरेदी केले आहे. ते जुने आहे. यासाठी तीन ते साडेतीन लाख रुपये त्यांनी खर्च केले होते.