पेट्रोल घोटाळ्याचा मुख्य आरोपी गजाआड
By admin | Published: July 13, 2017 05:52 AM2017-07-13T05:52:36+5:302017-07-13T05:52:36+5:30
दोघांच्या अटकेनंतर आता प्रकाश नुलकर या तिसऱ्या सूत्रधारास व मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पेट्रोल घोटाळ्यातील सूत्रधार विवेक शेट्ये आणि मीनल नेमाडे या दोघांच्या अटकेनंतर आता प्रकाश नुलकर या तिसऱ्या सूत्रधारास व मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. कर्नाटकातील हुबळी येथून ठाणे पोलिसांनी नुलकर यास अटक केली असून, पेट्रोलपंपावरील ‘डिस्पेन्सिंग युनिट’मध्ये फेरफार करणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक चिप्स’चा पुरवठा या आरोपींनी आणखी तीन देशांमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे.
शेट्ये, नुलकर आणि नेमाडे हे तिघेही ‘डिस्पेन्सिंग युनिट’च्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करायचे. त्यासाठी लागणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक चिप्स’ चीनमधून आयात केल्या जायच्या. त्या चिप्समध्ये नवीन प्रोग्राम लोड केल्यानंतर आरोपींनी त्याची विक्री चीन, अबुधाबी आणि दक्षिण आफ्रिकेतही केल्याची माहिती समोर आल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही हा घोटाळा असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
वैधमापनशास्त्र विभागासह पेट्रोलियम कंपन्यांचे कर्मचारीही या घोटाळ्यात असण्याची शक्यता असून पंपांना डिस्पेन्सिंग युनिटचा पुरवठा करणारेही रडारवर असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
>तीन पंपांचा मालक
पेट्रोलपंप घोटाळ्याचा सूत्रधार प्रकाश नुलकर हा तीन पंपांचा मालक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचा एक पेट्रोलपंप गोव्यात, तर दोन महाराष्ट्रात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.