जळीत हत्याकांडात पोलिस उपनिरीक्षक निघाला मुख्य सूत्रधार
By Admin | Published: September 12, 2016 09:23 PM2016-09-12T21:23:18+5:302016-09-12T21:26:19+5:30
तालुक्यातील पोहरादेवी शिवारातील काकडशिवणी शेतशिवारात २६ मे २०१६ रोजी अनोळखी इसमाचे प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले.
ऑनलाइन लोकमत
मानोरा, दि. १२ - तालुक्यातील पोहरादेवी शिवारातील काकडशिवणी शेतशिवारात २६ मे २०१६ रोजी अनोळखी इसमाचे प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले. प्रेम विवाहातून घडलेल्या या घटनेचा उलगडा पाच महिन्यानंतर झाला असून घटनेचा मुख्य सूत्रधार आसेगांव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक तुकाराम विठ्ठल ढोके (वय ५२ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी ढोकेसह पाच आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ढोकेच्या मुलीने १ एप्रिल २०१६ रोजी अमरावती येथील आर्य समाज मंदिरात सचिन प्रभुदयाल सिमोलीया (रा.फ्रेजरपुरा, गांधीनगर, अमरावती) याच्यासोबत प्रेमविवाह केला. हीच बाब ढोके परिवारात खदखदत होती.
दरम्यान, सचिन व मुलगी शिवाणी या दोघांना घेवून ढोके परिवार पुसदपर्यंत सोबत होते. त्यानंतर आरोपी तुकाराम ढोके व तुषार तुकाराम ढोके (रा.कारंजा) आणि प्रविण दत्तराम आगलावे (रा.पुसद) या तिघांनी पोहरादेवी परिसरातील काटेरी फास व पराटयामध्ये मृतदेह पेटवून दिला. परंतु मृतदेह अर्धवट जळाला.
तुकाराम ढोकेची पत्नी पुष्पा ढोके वय (वय ४५ वर्षे) हिला घटनेची संपूर्ण माहिती होती. शिवाणी ढोके ही मृतक सचिनसोबत पुसदपर्यंत प्रवासात होती. असे असताना तीने सदर गंभीर बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली नाही. मात्र, पोलिस तपासात तुकाराम ढोकेसह इतर चार जणांनीच सचिनचा खून केल्याची बाब निष्पन्न झाली. त्यावरून संबंधित पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना मानोरा न्यायालयात हजर केले असता १७ सप्टेंबर २०१६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.