पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविणार; रोजगार निर्मिती, जीडीपी वाढविण्याचे प्रमुख उद्दिष्ट - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:23 AM2021-07-09T10:23:18+5:302021-07-09T10:23:44+5:30
राणे म्हणाले की, मंत्रीपदाचा वापर देशाच्या हितासाठी करतानाच महाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे.
मुंबई : सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम मंत्रालयाच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात उद्यमशील वातावरण आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल, असे या खात्याचे नवे मंत्री नारायण राणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राणे म्हणाले की, मंत्रीपदाचा वापर देशाच्या हितासाठी करतानाच महाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असते ते तर करणारच; पण पंतप्रधानांनी दिलेल्या मोठ्या जबाबदारीला न्याय देणे, याला माझे सर्वाधिक प्राधान्य असेल. पंतप्रधानांचा विश्वास सार्थ करायचा आहे. कोरोनाच्या महामारीने उद्योग विश्वाचे मोठे नुकसान केले आहे. उद्योगचक्र आणि त्या माध्यमातून अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. खात्याच्या कामात स्वत:ला झोकून देऊन आव्हानांचा मुकाबला करायचा आहे. दरडोई उत्पन्न आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करत सध्याच्या मंदीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यासाठीचा अॅक्शन प्लॅन तयार केला जाईल. अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यानिमित्ताने जबाबदारीची जाणीवही करून दिली आहे. खाते कोणतेही बरे-वाईट नसते.
पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविणार
महाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असते ते तर करणारच; पण पंतप्रधानांनी दिलेल्या मोठ्या जबाबदारीला न्याय देणे, याला माझे सर्वाधिक प्राधान्य असेल.
- नारायण राणे, केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम