मुख्य रस्त्याचे काम रखडले

By admin | Published: May 30, 2016 02:09 AM2016-05-30T02:09:15+5:302016-05-30T02:09:15+5:30

व्ही.एन. पुरव मार्गाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे

Main road work | मुख्य रस्त्याचे काम रखडले

मुख्य रस्त्याचे काम रखडले

Next


मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून चुनाभट्टीतील व्ही.एन. पुरव मार्गाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच धुळीमुळे येथील रहिवाशांनाही याचा मोठा त्रास होत असल्याने अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
तीन वर्षांपूर्वी चुनाभट्टीतील सर्वच रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. मात्र यातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच येथील मुख्य रस्ता मात्र तीन वर्षांपासून अर्धवट आहे. कुर्ला आणि चेंबूरवरून चुनाभट्टीत प्रवेश केल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे निदर्शनास येते. या रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याने पालिकेने हा रस्ता पूर्णपणे आरसीसी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्षभरापूर्वी काम सुरू करण्यात आले. मात्र एकाच बाजूचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने वर्ष घेतल्याने या मार्गावर मोठी वाहतूककोंडी होत आहे.
अर्धा रस्ता सिमेंटचा, अर्धा रस्ता डांबरी आणि अर्ध्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक अशी स्थिती या चुनाभट्टीतील मुख्य रस्त्याची आहे. तर काही ठिकाणी रस्ता अर्धवटच खोदलेला असल्याने या रस्त्यालगत वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे टॅक्सी आणि रिक्षाचालक या परिसरात भाडे घेऊन जाण्यास नकार देतात. येथील परिसरात जाण्यासाठी बेस्टची व्यवस्था नसल्याने अनेक रहिवाशांना चालतच घर गाठावे लागते. पालिकेने या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून रहिवासी करीत आहेत. मात्र महापालिकेने रहिवाशांच्या मागणीकडे कानाडोळा केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Main road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.