संगीत नाटक टिकवणं सर्वांचेच आद्य कर्तव्य : मधुवंती दांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 07:05 AM2020-06-25T07:05:00+5:302020-06-25T07:05:04+5:30

अभिजात मराठी संगीत नाटक हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा..

Maintaining musical drama is everyone's first duty: Madhuvanti Dandekar | संगीत नाटक टिकवणं सर्वांचेच आद्य कर्तव्य : मधुवंती दांडेकर

संगीत नाटक टिकवणं सर्वांचेच आद्य कर्तव्य : मधुवंती दांडेकर

Next
ठळक मुद्देयंदाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना जाहीर

मराठी संगीत रंगभूमीवरील एक ॠषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मधुवंती दांडेकर. रंगभूमीवरील 55 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ मराठीच नव्हे तर उर्दू आणि गुजराती रंगभूमीवर देखील स्वत:चा वेगळा ठसा उमटविणा ऱ्या प्रतिभावंत गायिका आणि अभिनेत्रीला राज्य शासनातर्फे यंदाचा ‘अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त ’लोकमत’ शी साधलेल्या संवादातून  ‘अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाचा मिळालेला पुरस्कार हा आशिर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात संगीत नाटकांचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवून ठेवत त्याचे सादरीकरण केल्यास संगीत नाटकांना मरण नसल्याचेही त्या म्हणाल्या. 

------------------------------------------- 

नम्रता फडणीस

 * मराठी रंगभूमीचे आद्य संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दलची भावना काय? - मी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या  ‘संगीत सौभद्र’ नाटकात सुभद्रेची भूमिका केली. गुरू स्वरराज छोटा गंधर्व यांच्यासमवेत याच नाटकात रूख्मिणीची भूमिका देखील करायला मिळाली. भूमिका फार मोठी नसली तरी ती नेमकेपणाने मांडली जाणं हे महत्वाचं असतं. कथा खूप छोटी असतानाही लिखाणातून कथानक उभं करण्याची ताकद त्यांच्यात होती. अण्णांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा एक आशीर्वाद असल्याचे मी मानते. चांगलं काम करण्याची उर्जा यातून मिळते. 

*  रंगभूमीवरील इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तो अनुभव कसा होता?

 - स्वरराज छोटा गंधर्व, पं. राम मराठे यांच्यासारख्या गुरूस्थानी असलेल्या कलावंतांबरोबर काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. हे सर्व कलाकार उत्तम गवय्ये होते. शास्त्रीय संगीताची त्यांची बैठक उत्तम होती. त्यांच्याकडून नाट्यपदं कशी गायची ते शिकायला मिळाले. अभिनयातही त्यांचा हातखंडा होता. गुरूस्थानी असलेल्या जयमाला शिलेदार यांच्याबरोबर जरी काम केले नसले तरी त्यांच्या भूमिकांच्या निरीक्षणातून खूप काही शिकले. संगीत नाटकांचा जो वारसा यांच्याकडून चालत आला आहे. तोच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विद्याधर गोखले यांच्या  रंगशारदा संस्थेच्या नाटकांमध्ये जे शिकले ते सादर करता आले याचा आनंद आहे.

 * मराठी संगीत नाटकांबरोबरच उर्दू आणि गुजराती नाटकांकडे कशा वळलात? 

-शासनाच्या उर्दू विभागातर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असतं. त्यांच्यामार्फत विद्याधर गोखले यांच्या पुढाकारातून  ‘नेक परवीन’नाटक करायचं ठरलं. त्यात मी नायिकेची भूमिका केली. ग्वाल्हेर च्या विजय चौहान यांच्याकडे मी गझलचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे उर्दू भाषा अवगत होतीच. त्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. मराठी ' सुवर्णतुला' नाटक गुजरातीमध्ये करण्यासाठी निर्मात्याला अभिनेत्री मिळत नव्हती. त्यासाठी मला विचारणा झाल्यानंतर मी त्या भाषेचा अभ्यास केला. गुजरातीचा गंध नसतानाही रूख्मिणीची भूमिका चांगल्या प्रकारे वठवता आली याचा आनंद आहे. सध्याच्या काळात संगीत नाटकांच्या बाबतीत असे प्रयोग होताना दिसत नाहीत. 

* मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची उज्वल परंपरा लाभली आहे. मध्यंतरीच्या काळात संगीत नाटकांना उतरती कळा लागली. त्याबाबत तुमची निरीक्षणे कोणती?

 - पूर्वी गंधर्व काळात संगीताचा प्रसार होता. रसिकांना सकस कलाप्रकार अनुभवायला मिळत होता. त्यानंतरच्या काळात बोलपट आणि चित्रपट आले. सध्याचा विचार केला तर प्रेक्षकांसमोर अनेक माध्यमं समोर आहेत. कला अनुभवायला एक स्वस्थता लागते. जी तरूण पिढीकडे नाही. त्यांच्याकडे कलागुण आहेत. पण त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही ही वस्तु स्थिती आहे. संगीत नाटकासाठी लेखन, संगीत चांगलं हवं. गायनाची उत्तम तयारी हवी. अशी तरूण मंडळी पुढे आली तर नाटकं नक्की होतील. प्रत्येक नाटक कंपनींनी संगीत नाटक करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानलं तर आजची तरूण पिढी संगीत नाटकं करू शकतील आणि ती पुन्हा रंगमंचावर येतील. अभिजात मराठी संगीत नाटक हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे. तो टिकवून ठेवला पाहिजे. चांगल्या संगीत नाटकांना प्रेक्षक येतोच. संगीत नाटकांबददल व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता त्याचे नव्या पद्धतीने उत्तम दर्जा आणि गुणवत्ता टिकवून सादरीकरण व्हायला हवे.

 * रिअँलिटी शोमधील लहान मुलांच्या सादरीकरणाबददल काय वाटतं? 

-रिअँलिटी शोमध्ये लहान मुलं खूप उत्तम गातात. त्यांची आकलन क्षमता उत्तम असते. पण ते ऐकून सादरीकरण केलेले असते. संगीतात स्वत: ची साधना आणि तालीम देखील महत्वाची आहे. मुलाला प्रसिद्धधी मिळेल त्याचं नाव होईल अशी अपेक्षा पालकांनी ठेवू नये. संगीत विद्या म्हणून शिकले गेले पाहिजे.

Web Title: Maintaining musical drama is everyone's first duty: Madhuvanti Dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.