‘मातीविना शेती’ हे तंत्र अवलंबा: शरद पवार
By Admin | Published: January 28, 2017 01:10 AM2017-01-28T01:10:57+5:302017-01-28T01:10:57+5:30
भिमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, नवतंत्रज्ञानातून संसार समृद्ध करण्याची कोल्हापूरकरांत ताकद
कोल्हापूर : उद्योगांसह इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्याने भविष्यात ‘मातीविना शेती’ असा हायड्रोफोनिक शेतीचा प्रयोग करावा लागेल. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच देश सक्षम होणार असल्याने शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून आपला संसार समृद्ध करावा. शेतीमधील परिवर्तनाची ताकद कोल्हापुरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मनगटात आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
भिमा उद्योगसमूहाच्या वतीने मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘भिमा कृषी - २०१७’ या कृषी व पशू प्रदर्शनाचे शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. भीमराव महाडिक यांनी सांगलीतून पंढरपुरात जाऊन शेती व साखर कारखानदारीत जम बसविला. अशा आदर्शवत व्यक्तीच्या नावाने कृषी प्रदर्शन भरविल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगत शरद पवार म्हणाले, एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज गहू, साखर, तांदूळ निर्यातीमध्ये आघाडीवर आहे. काळ्या आईची इमानी सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाला योग्य मोबदला मिळाला तर काय होऊ शकते, हेच यातून स्पष्ट होते. उद्योग, रस्ते, रेल्वे, धरणांसाठी जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्याने शेतीवर बोजा वाढत आहे. यासाठी शेतीसह इतर क्षेत्रांकडे वळले पाहिजे.
नोटबंदीवर सडकून टीका करीत, पवार म्हणाले, काही वेळा केंद्र सरकारने अंगात आल्यासारखे केले की झटके बसतात. नोटबंदीमुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली, दूध व्यवसाय तर पूर्ण अडचणीत आला. काळा पैसा आपल्या खात्यात जमा होईल, या आशेने लोक आतापर्यंत शांत होते; पण आता कुरबूर सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे सांगत संयोजक खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पवारसाहेबांच्या प्रेरणेतूनच प्रदर्शन घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, याची दहा वर्षे वाट पाहत होतो. महापौर हसिना फरास, आमदार हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. रामराजे कुपेकर यांनी आभार मानले.
निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजित शिंदे, डॉ. जनार्दन पाटील यांना ‘भिमा कृषी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैशाली पाटील , काशीबाई मोरे , रूपाली सावंत , लक्ष्मी पाटील यांना ‘जिजामाता शेतीभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, आमदार भारत भालके, के. पी. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, ललित गांधी, सत्यजित भोसले, आदी उपस्थित होते.
शरद पवारांकडून महाडिकांचे कौतुक
गेली दहा वर्षे खासदार धनंजय महाडिक हे भीमा कृषी प्रदर्शन भरवत आहेत. या प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांची प्रगती होत आहे. शेतकरी शेतीत त्यातून नवनवीन प्रयोग करीत आहेत. याचा उल्लेख करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांचे चांगलेच कौतुक केले.
‘केडीसीसी’चा चेअरमन कोण?
राज्यातील ३१ जिल्हा बॅँकांत ८६६० कोटींच्या जुना नोटा पडून आहेत. अजूनही नवीन चलन मिळते का? केडीसीसी बॅँकेचा चेअरमन कोण आहे? अशी विचारणा हसन मुश्रीफ यांनाच केल्याने हशा पिकला. आपणच चेअरमन असल्याचे मुश्रीफ यांनी सांगताच, ‘नोटा-बिटा काही मिळते का नुसतेच बसता?’ असा चिमटाच पवार यांनी काढला.
आई कोल्हापूरची म्हणूनच ‘पद्मविभूषण’
एकाच घरातील तीन भावांचा ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान होण्यामागे विविध कारणे सांगितली जात असली तरी माझ्या दृष्टीने आणखी एक कारण आहे. ज्या मातेने आम्हांला जन्म दिला, ती कोल्हापूरची होती. तिचा जन्म, शिक्षण कोल्हापुरात झाले. कोल्हापूरचे पाणीच काही वेगळे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्या मातेचा विसर करून चालणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी भावना व्यक्त केल्या.
भिमा कृषी प्रदर्शन खुले
चारशे स्टॉल्स : शेतकरी बांधवांची गर्दीकोल्हापूर : शेतीपूरक व शेतीशी निगडित असलेली माहिती पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकाच छताखाली मिळावी, या उद्देशाने कोल्हापुरात मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आलेले ‘भिमा कृषी प्रदर्शन’ शुक्रवारपासून खुले झाले. या प्रदर्शनात सुमारे चारशे स्टॉल्स असून, शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती या ठिकाणी आहे.कृषी, प्लास्टिकल्चर, पशुपालनासह बैल, गायी, बकरी यांच्या वेगवेगळ्या जातींची जनावरे ही प्रदर्शनातील मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून खासदार धनंजय महाडिक हे भिमा कृषी प्रदर्शन याठिकाणी भरवितात. पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी दरवर्षी या प्रदर्शनाचा लाभ घेतात. प्रदर्शनाच्या चार दिवसांत सुमारे पाच ते सहा लाख लोक या ठिकाणी येतात. यंदा शुक्रवारपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली. सोमवार (दि. ३०) पर्यंत कृषी प्रदर्शनासह कलाविष्कार, संगीताचा कार्यक्रम, नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
स्टॉल्सची उत्कृष्ट मांडणी
यंदाच्या स्टॉल्समध्ये प्रत्येक विभागात २५ स्टॉल्स आहेत. त्यामुळे प्रदर्शनात येणाऱ्यांना ते सुटसुटीतपणे पाहावयास मिळणार आहे.
भिमा उद्योगसमूहाच्या वतीने मेरी वेदर ग्राउंड येथे शुक्रवारपासून भिमा कृषी प्रदर्शनास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी डावीकडून ललित गांधी, ए. वाय. पाटील, हसिना फरास, महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, अमल महाडिक, कल्लाप्पाण्णा आवाडे, सुरेश कुराडे, आदी उपस्थित होते.