‘मैत्र मांदियाळी’ने घेतला शैक्षणिक पालकत्वाचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:56 AM2019-05-19T04:56:18+5:302019-05-19T04:56:21+5:30
गरीब-वंचित मुलांना आणि त्यांना सांभाळणाऱ्या संस्थांना मदत करणारा साधारण दीडशे जणांचा हा गट.
गजानन दिवाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शाळाबाह्य मुलांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात; पण परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुला-मुलींचे काय? हाच विचार करून जालन्यातील ‘मैत्र मांदियाळी’ने या मुला-मुलींचे पालकत्व घेतले. आतापर्यंत साधारण ४० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून या उपक्रमाद्वारे उच्च शिक्षणाची दारे खुली करून दिली.
गरीब-वंचित मुलांना आणि त्यांना सांभाळणाऱ्या संस्थांना मदत करणारा साधारण दीडशे जणांचा हा गट. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पदांवर काम करणारे हे सर्वजण. महिन्याला प्रत्येकी २०० रुपये जमा करतात. शिवाय विविध माध्यमांतून समाजातून महिन्याला साधारण सव्वा लाखाच्या आसपास रक्कम जमा होते. पालकत्व घेणारे वा अन्य मार्गाने मदत करणाऱ्यांची संख्या सात हजारांच्या घरात आहे, अशी माहिती अजय किंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली. वेगवेगळ्या कारणांनी शिक्षणापासून दुरावलेल्यांना मदत केली.
शैक्षणिक पालकत्व ही सहज सुचलेली कल्पना. मैत्र मांदियाळीचे सदस्य निवृत्ती रुद्राक्ष यांच्या दुकानात काम मागण्यासाठी एक मुलगा आला. आठवीत शिकत होता तो. वडील रोलिंग मिलमध्ये कामाला. बहिणीला दप्तर-वह्या घेता याव्यात म्हणून एक महिना तो काम करायचा. ‘आता तू काम करू नकोस. शाळा सुरू होण्याआधी ये. आम्ही तुला दप्तर-वह्या देऊ’, असे सांगून निवृत्ती यांनी त्याला परत पाठविले आणि सुरू झाली शैक्षणिक पालकत्वाची सफर.
यशवंत, हा निलंगा (जि. लातूर) तालुक्यातील. आई-वडील व एक लहान भाऊ. वडील व्यसनी. शेती नाही. त्याला दोन वर्षांपासून मेस, रूमभाड्यासाठी दरमहा चार हजार व इतर मदत केली जात आहे. तो राज्य गुप्त वार्ता विभागात निरीक्षक झाला आहे. तसेच तो मंत्रालयीन सहायक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला.
हरिओम, जालना जिल्ह्यातील. चुकीचे रक्त दिल्यामुळे त्याला ‘एड्स’ जडला. त्यामुळे वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि ते गाव सोडून भटकू लागले. मुलगा मामाकडे आला; पण मामाची परिस्थितीही बेताचीच. यावर्षी तो दहावीमध्ये जाईल. त्याला एका वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला.
अकोला तालुक्यातील एक मुलगी. वडील दिव्यांग. आई मजुरी करायची. तिला अर्धांगवायू झाला. मुलगी हुशार. तिला नर्सिंगला जायचे होते. तिच्या पहिल्या वर्षाची ६५ हजार रुपये फी व हॉस्टेलचे २० हजार रुपये भरले. इतर मासिक खर्चही ‘मैत्र मांदियाळी’तर्फे दिला जातो.
दीपक हा जालना तालुक्यातील. ‘मैत्र’चे सदस्य रामेश्वर कौटकर यांच्या दुकानावर कामाला आला. वडील सालदार आहेत. दोघा मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपणार नाही व भावाच्या शिक्षणाला मदत म्हणून मी काम करीत असल्याचे त्याने सांगितले. दहावीला त्याला ९१ टक्के गुण होते.
वडील टोलनाक्यावर कामाला. आई शिवणकाम करून घराला हातभार लावते. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात तिला बीएस्सीला प्रवेश मिळाला. दरवर्षीचे शुल्क ५५ हजार रुपये होते. तिला ३ वर्षे प्रवेशासाठी मदत केली. हे तिचे शेवटचे सत्र आहे.
अनिलचे वडील भोळसर, आई केटरिंगमध्ये कामाला जाते. औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्सला प्रवेश मिळाला. पहिल्या वर्षाचे शुल्क कसेबसे भरले. यावर्षी संस्थेतर्फे त्याला ३३ हजारांची मदत केली.