माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 11:14 AM2024-10-05T11:14:34+5:302024-10-05T11:16:32+5:30

डिसेंबर २०२२ मध्ये या माजी खासदारांनी शरद पवारांची साथ सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Majeed Memon Exits for Mamta Banerjee TMC Party, Rejoins Sharad Pawar NCP Ahead of Maharashtra Elections | माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी

माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यात २ वर्षापूर्वी शरद पवारांना सोडून ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीत प्रवेश केलेले माजी खासदार माजिद मेमन पुन्हा घरवापसी करणार आहेत. माजिद मेमन देशातील एक प्रसिद्ध वकील आणि राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. मेमन हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते परंतु ममता यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला होता. टीएमसी बंगाल वगळता इतर राज्यात नाही, भविष्यात येण्याची स्थिती नाही त्यामुळे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय माजिद मेमन यांनी घेतला आहे.

माजिद मेमन म्हणाले की, गेली अनेक वर्ष मी शरद पवारांसोबत काम केले आहे. त्यामुळे शरद पवारांसोबत पुन्हा राहून त्यांचा हात बळकट करणे आणि अल्पसंख्याकांच्या मुद्दे सोडवणे हे काम मी करणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षासाठी प्रचार करत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी प्रयत्न करेन असं त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. केवळ १० जागा लढवून पवारांनी त्यातील ८ जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे २०१४,२०१९ च्या तुलनेने पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार दुप्पट झालेत. 

डिसेंबर २०२२ मध्ये केला होता टीएमसीत प्रवेश 

माजिद मेमन हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, परंतु डिसेंबर २०२२ मध्ये मेमन यांनी शरद पवारांची साथ सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा राष्ट्रवादीत सहभागी होणार आहेत. माजिद मेमन हे २०१४ ते २०२० या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर खासदार होते. राज्यसभेत त्यांनी लोक अदालत, विधी आणि कायदा या संसदीय समितींमध्ये काम केले. 

दरम्यान, प्रसिद्ध वकील म्हणून माजिद मेमन यांनी राजकारणी, मानवाधिकार कार्यकर्ते आणि चित्रपट कलाकारांसह भारतीय सेलिब्रिटींचे वादग्रस्त खटले लढवले आहेत.  प्रत्यार्पणाच्या विविध खटल्यांमध्ये त्यांनी परदेशातील हाय-प्रोफाइल भारतीयांचा बचाव केला. यासोबतच मेमन हे मानवाधिकार कार्यकर्तेही आहेत.

Web Title: Majeed Memon Exits for Mamta Banerjee TMC Party, Rejoins Sharad Pawar NCP Ahead of Maharashtra Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.