अवैध दारू वाहतूकी विरोधात इन्सुली येथे मोठी कारवाई ; 70 लाखांचा मुद्देमाल जप्त
By अनंत खं.जाधव | Published: October 14, 2022 11:41 PM2022-10-14T23:41:37+5:302022-10-14T23:44:10+5:30
राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली दुरक्षेत्रावर गोवा बनावटीची दारु वाहतूक करत असलेला कंटेनर पकडला असून अवैध दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे.
सिंधुदुर्ग: राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली दुरक्षेत्रावर गोवा बनावटीची दारु वाहतूक करत असलेला कंटेनर पकडला असून, अवैध दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४६ लाख ७५ हजार २०० रुपयांच्या दारुसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी हरिश्चंद्र श्रीराम जाधव (४१, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटे इन्सुली उत्पादन शुल्क च्या दुरक्षेत्रावर करण्यात आली.
गोव्यातून येणारा कंटेनर (एमएच ०४ केयु २६८८) तपासणीसाठी इन्सुली येथे थांबविण्यात आला. कंटेनरच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात दारुसाठा होता. यात एकूण ८२९ कागदी बॉक्स होते. बाजारभावाप्रमाणे दारुची किंमत ४६ लाख ७५ हजार २०० आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २३ लाखांचा कंटेनर असा एकूण ६९ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक एस. पी. मोहिते, दुय्यम निरीक्षक पी. एस. रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान संदीप कदम, सांगलीचे दुय्यम निरीक्षक हणमंत यादव, जवान जयसिंग पावरा, प्रकाश माने यांच्या पथकाने केली.