सप्टेंबरमध्ये पोलीस दलात मोठे फेरबदल
By admin | Published: April 17, 2015 01:26 AM2015-04-17T01:26:15+5:302015-04-17T01:26:15+5:30
सप्टेंबर महिन्यात राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ आणि अरुप पटनायक निवृत्त होत असून राकेश मारिया आणि मीरा बोरवणकर यांची महासंचालकपदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
अतुल कुलकर्णी - मुंबई
सप्टेंबर महिन्यात राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ आणि अरुप पटनायक निवृत्त होत असून राकेश मारिया आणि मीरा बोरवणकर यांची महासंचालकपदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर प्रवीण दीक्षित यांना मुख्य पोलिस महासंचालक पदी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपद आणि एसीबीचे महासंचालकपदही रिक्त होईल. त्यामुळे सप्टेंबर अखेरीस वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल अपेक्षित आहेत.
शिवाय या महिन्यापासून मार्च २०१६ या अकरा महिन्यात सात वरिष्ठ अधिकारी निवृत्तीच्या वाटेवर असल्याने राज्याच्या पोलीस दलात ज्येष्ठांची मोठी फळी देखील कमी होणार आहे. अतिरिक्त महासंचालक सुरेंद्रकुमार (मे), संजीव दयाळ, अरुप पटनायक (सप्टेंबर), जावेद अहमद (जानेवारी २०१६), विजय कांबळे (फेब्रुवारी) आणि पुण्याचे आयुक्त के.के. पाठक (मार्च) महिन्यात निवृत्त होत आहेत.
आजपर्यंत सेवाज्येष्ठतेनुसारच मुख्य पोलिस महासंचालकाची निवड झाली. अपवाद फक्त अनामी रॉय यांचा होता. पण तो ही निर्णय बदलला गेला. सध्या एसीबीचे प्रमुख प्रवीण दीक्षित सेवाज्येष्ठतेच्या यादीत सगळ्यात वर आहेत. त्यामुळे ते आता मुख्य महासंचालक होतील. महासंचालकांची सहा पदे तयार झाल्यामुळे मारिया आणि बोरवणकर रिक्त झालेल्या दोन जागांवर जातील. खरी स्पर्धा मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी असेल. भाजपाला आपल्या विश्वासातला आणि सेवाज्येष्ठतेच्या निकषात बसणारा आयुक्त पाहिजे. मारिया यांच्यानंतर सध्या प्रतिनियुक्तीवर दिल्लीत इंटीलिजन्स ब्युरोत असणारे दत्ता पडसळगीकर आणि पुण्याचे आयुक्त के. के. पाठक यांचा क्रम आहे. मात्र पडसळगीकर महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाहीत. पाठक यांना आत्ताच पुण्याचे आयुक्त केले आहे. शिवाय ते मार्चमध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांना फक्त सहाच महिने मिळतात. नागपूरचे ट्रॅक रेकॉर्डही त्यांना या वेळी अडचणीचे ठरणारे आहे.
त्यानंतर येणारे प्रभात रंजन, व्ही. डी. मिश्रा आणि सूर्यप्रकाश गुप्ता यांचा नंबर असला तरी अतिरिक्त महासंचालकांमधून कुणा एकाची निवड मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी होऊ शकते.
दरम्यान, मे महिन्यात जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांच्या बदल्यांवर दयाळ यांची छाप असेल असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
च्मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या संभाव्य यादीत संजय बर्वे, हिमांशू रॉय, परमवीर सिंग, सुबोधकुमार जैस्वाल अशी काही अतिरिक्त महासंचालकांची नावे आहेत.
च्संजय बर्वे यांचे नाव आदर्शमध्ये अशोक चव्हाण यांच्याशी जोडले गेले होते. तर हिमांशू रॉय यांना एकच वर्षाच्या आत एटीएसवरून दूर केले गेले आहे.