मेट्रो-३ च्या कामाला मोठा झटका, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:46 AM2017-08-12T04:46:43+5:302017-08-12T04:46:47+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ चे काम रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला दिला आहे. या आदेशामुळे भुयारी मेट्रोच्या कामाला झटका बसला असून कामाची डेडलाइन वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ चे काम रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला दिला आहे. या आदेशामुळे भुयारी मेट्रोच्या कामाला झटका बसला असून कामाची डेडलाइन वाढण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांनी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-३ चे काम हाती घेतले आहे. अनेक ठिकाणी रात्रीही कामे सुरूआहेत. रात्रीच्या कामामुळे रहिवाशांची झोपमोड होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. नरिमन पॉइंट येथे यापूर्वीही मेट्रोचे काम रात्री करण्यात येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी आवाज उठविला होता. अखेर कुलाबा येथील रॉबिन जयसिंघांनी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
कुलाबा-कफ परेड हा भाग सीआरझेड अंतर्गत येत असल्याने येथे विकास कामांवर मर्यादा आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून निवासी विभागातील ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा पायदळी तुडवल्या जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
काँक्रिटीकरण दिवसा कठीण
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही आपली भूमिका मांडली आहे. दिवसा परिसर गजबजलेला असल्याने काँक्रिटीकरणाचे काम रात्री करावे लागते; त्याला पर्याय नाही. महत्त्वाचे म्हणजे हे
काम करताना कोणालाही जाणूनबुजून त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे एमएमआरसीने म्हटले आहे.
रहिवाशांना होणाऱ्या त्रासासाठी प्रत्येक रात्रीसाठी दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी गांभीर्याने घेत मेट्रोचे रात्रीचे काम थांबविण्यात यावे, असे निर्देश मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एन.एम. जमादार यांच्या खंडपीठाने दिले.