कामबंद आंदोलनातही मोठ्या शस्त्रक्रिया सुरू; निवासी डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर किंचित परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 10:02 AM2024-08-15T10:02:00+5:302024-08-15T10:02:25+5:30
शिक्षण विभागाचे लेखी आश्वासन, सुरक्षा आढाव्याच्या अधिष्ठात्यांना सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णसेवेवर किंचित परिणाम झाला. आंदोलन काळातही महापालिका आणि शासकीय रुग्णालयांत दिवसभरात २७३ छोट्या आणि काही मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. संपातही अध्यापकांच्या मदतीने नियमित कामे सुरू असून, बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांनाही दुपारपर्यंत तपासण्यात आले. अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने रुग्णसेवेवर कोणताही गंभीर परिणाम झालेला नाही. या काळात शवविच्छेदन करून अहवालही वेळेवर देण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मात्र, रुग्णालयाच्या अध्यापकांनी उशिरापर्यंत बाह्य रुग्ण विभागात बसून शिकाऊ डॉक्टर आणि परिचारिकांच्या मदतीने सर्व रुग्णांना उपचार दिले गेले. त्याचप्रमाणे तातडीने उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने बुधवारी रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागांत नेहमीपेक्षा कमी रुग्ण आले होते. त्याशिवाय नियोजित शस्त्रक्रिया करण्यासाठी येणारे अनेक रुग्ण आंदोलनामुळे दाखल झाले नाहीत, असे सांगण्यात आले. गुरुवारीही हे आंदोलन सुरू राहणार आहे.
- शिक्षण विभागाचे लेखी आश्वासन- जुन्या वसतिगृहांची डागडुजी, नवी वसतिगृहांची उभारणी, तसेच वसतिगृहांना संरक्षक भिंती, निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेत देणे या मागण्यांची पूर्तता करण्याकरता वैद्यकीय शिक्षण विभागाने चार अधिष्ठात्यांची समिती नेमली आहे. समितीने सर्व गोष्टींचा अभ्यास करून दोन महिन्यांत विभागाला अहवाल सादर करणे गरजेचे आहे.
- सुरक्षा आढाव्याच्या अधिष्ठात्यांना सूचना
वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी बुधवारी विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रमुखांची बैठक घेतली. प्रत्येक अधिष्ठात्याने आपल्या रुग्णालयातील सुरक्षिततेचा आढावा घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच त्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी अशी सूचनाही दिली. रुग्णालय परिसरात कोणत्या ठिकाणी पथदिवे आणि सीसीटीव्हीची गरज आहे, त्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या, असे सूत्रांनी सांगितले.