पाच जि.प.मध्ये भाजपाला बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 04:47 AM2017-02-25T04:47:30+5:302017-02-25T04:47:30+5:30
२५ जिल्हा परिषदांच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पाच ठिकाणी बहुमत मिळाले तर पाच ठिकाणी भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.
मुंबई : २५ जिल्हा परिषदांच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पाच ठिकाणी बहुमत मिळाले तर पाच ठिकाणी भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ग्रामीण भागात पक्षाचे स्थान यानिमित्ताने अधिक मजबूत झाल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी आज दिली.
जळगाव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि लातूर येथे भाजपाला बहुमत मिळाले. सांगली, गडचिरोली, बुलडाणा, औरंगाबाद आणि जालना जिल्हा परिषदेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला. आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष ज्या ठिकाणी ठरलेलो आहोत तेथे इतर काही पक्ष, अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे खा. दानवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिवसेनेला फक्त रत्नागिरीत तर काँग्रेसला सिंधुदुर्गमध्ये बहुमत मिळाले आणि राष्ट्रवादीला पुणे आणि सातारामध्येच बहुमत मिळविता आले. शिवसेना यवतमाळ आणि रायगडमध्ये सर्वांत मोठा पक्ष आहे. काँग्रेसने हे यश नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये मिळविले. राष्ट्रवादीला ते सोलापूर, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबादमध्ये मिळाले. २५ जिल्हा परिषदांच्या २०१२मधील निवडणुकीत भाजपाला २०५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी हे संख्याबळ ६२९ झाले. पक्षाने ४२४ जागा अधिक जिंकल्या. (विशेष प्रतिनिधी)