कलाकारांचे जगणे सुसह्य करा
By admin | Published: April 22, 2017 01:25 AM2017-04-22T01:25:27+5:302017-04-22T01:25:27+5:30
उमेदीच्या काळात कलाकारांना सगळेच डोक्यावर घेतात. असेच लक्ष त्याच्या निवृत्ती काळातही दिले पाहिजे. निवृत्त कलावंतांना आज दिवसाला केवळ ७० रुपये पेन्शन मिळते.
- विशाल सोनटक्के, सुलभा देशपांडे नाट्यनगरी (उस्मानाबाद)
उमेदीच्या काळात कलाकारांना सगळेच डोक्यावर घेतात. असेच लक्ष त्याच्या निवृत्ती काळातही दिले पाहिजे. निवृत्त कलावंतांना आज दिवसाला केवळ ७० रुपये पेन्शन मिळते. त्यात नेमके त्यांनी कसे जगायचे, हा प्रश्न सरकारला
का पडत नाही, असा सवाल करीत सन्मानाबरोबरच कलाकाराचे जगणे सुसह्य व्हावे याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केली.
तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या सुलभा देशपांडे नाट्यनगरीत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
नाट्यचळवळीला खऱ्या अर्थाने गती मिळावी, असे वाटत असेल तर पुण्या-मुंबईबरोबरच ग्रामीण भागातील नाट्यगृहांची सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत सावरकर यांनी व्यक्त केले.
रणरणत्या उन्हात अभूतपूर्व प्रतिसाद...
काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ हून अधिक आहे. मात्र, अशा रणरणत्या उन्हातही संमेलनाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबाबत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी उस्मानाबादकरांचे कौतुक केले. पुढील दोन दिवसात तीनही रंगमंचांवर कार्यक्रमांची लयलूट असणार आहे. या कार्यक्रमांना असाच प्रतिसाद मिळावा, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
दिंडीने दुमदुमली नाट्यनगरी...
अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील कसबाराम मंदिरापासून संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते नाट्य दिंडीस प्रारंभ झाला. दिंडीतील सहभागी नाट्यप्रेमी, विद्यार्थ्यांच्या जयघोषणाने उस्मानाबादनगरी अक्षरश: दुमदुमून गेली.