‘मेक इन’चे ब्रँडिंग खाक!
By admin | Published: February 14, 2016 11:59 PM2016-02-14T23:59:40+5:302016-02-14T23:59:40+5:30
मेक इन इंडिया’ योजनेचे ‘ब्रँडिंग’ करण्यासाठी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमाचे व्यासपीठ कार्यक्रम सुरू असतानाच जळून खाक झाले
गिरगाव चौपाटीवर अग्नितांडव : ‘महाराष्ट्र रजनी’चे व्यासपीठ भस्म
मुंबई : ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेचे ‘ब्रँडिंग’ करण्यासाठी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमाचे व्यासपीठ कार्यक्रम सुरू असतानाच जळून खाक झाले. या दुर्घटनेत जिवितहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नव्हते. या आगीमुळे सप्ताहालाच गालबोट लागले आहे.
गिरगाव चौपाटीवर रविवारी रात्री ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांंर्गत मेगा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या भव्य व्यासपीठ उभारले होते. महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण सुरू होते. या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन, आमीर खान यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठावर अभिनेत्री पूजा सावंत यांचा चमू लावणी सादर करत होता. नेमके यावेळी नटराजाची मूर्ती असलेल्या व्यासपीठाच्या मध्यभागी आग लागली. दर्शनी भागावर लागलेल्या या आगीनंतर तत्काळ व्यासपीठावर नृत्य सादर करणाऱ्याना कलावंतांना खाली उतरवण्यात आले. मुंबई पोलिसांनी समयसूचकता दाखवत संपूर्ण व्यासपीठासह परिसर रिकामा केला. अवघ्या काही मिनिटांत व्यासपीठावर लागलेल्या आगीने भयंकर स्वरुप घेतले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सोळा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सहा वॉटर टँकर आणि जेट इंजिनद्वारेही आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र घटनास्थळी शोभेचे दारुकाम आणि अग्नीशमन सिलिंडरर्सचा स्फोट झाला. चौपाटीवरील वाऱ्याने ही आग आणखी पसरली. रात्री या परिसरात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने अग्मिशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहचण्यास काहीसा विलंब झाला. शिवाय सोफा, खुर्च्या आणि पुतळे उभारण्यात आल्याने आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.
काय घडले, कसे घडले?
नटराजाच्या मूर्तीजवळ सुरुवातीला शॉर्टसर्किट
पीओपीचे कामाने सुरुवातीला पेट घेतला
फायर वर्क्सच्या सामानामुळे आगीचा भडका वाढला
सीएम, उद्धव ठाकरेंपासून अवघ्या २५ फुटांवर आग लागली
आगीवेळी ८००-९०० कलावंत व्यासपीठाच्या मागे होते
६० देशांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते
ढोल पथक, गोविंदा पथकातील कलावंताचा समावेश होता
मुंबई पोलिसांची सतर्कता महत्त्वाची ठरली
पोलिसांनी कलावंतांना, नागरिकांना बाहेर काढले
पोलिसांनी १५ मिनिटांत गिरगाव चौपाटी रिकामी केली
पोलिसांनी कार्पेट आणि ज्वलनशील पदार्थ आगीपासून दूर नेले
सतर्कतेमुळे चेंगराचेंगरीचा प्रसंग उद्भवला नाही
पहिल्या १५ मिनिटांत ३-४ मोठे ब्लास्ट झाले
साऊंड सिस्टिम आणि लाईट्समुळे आग वाढली
‘काही वेळात परिस्थिती नियंत्रणात’
कार्यक्रमात लावणी सादर झाल्यानंतर हा अपघात झाला. अग्निशमन दल घटनास्थळी वेळेत दाखल झाले. काही वेळातच इथली परिस्थिती नियंत्रणात आली. कोणीही जखमी झालेले नाही.
- शायना एन.सी., भाजप नेत्या
‘सामान सोडून निघालो’
लावणीनंतर गोविंदा पथकांचा डान्स होणार होता. त्यात आमचे प्रेमनगर स्पोटर््स क्लब, चुनाभट्टी येथील ५२ मुले स्टेज मागे होती. आम्ही तत्काळ स्टेजचा परिसर सोडला. पण आमच्या बॅगा, अन्य सामान, मोबाईल हे तेथेच राहिले. सामान तेथेच सोडून आम्ही जीव वाचवला.
- अमृत कोठेकर, गोविंदा, प्रेमनगर स्पोटर््स क्लब
तरुण संशोधकांना सहकार्य - मुख्यमंत्री
तरु णांकडील नवीन कल्पना, नवे अविष्कार आणि संशोधन हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे या तरु णांना संशोधनासाठी व नवे अविष्कार घडवण्यासाठी सिलिकॉन व्हॅली आणि सिंगापूरसारखे संशोधनपूरक वातावरण निर्माण करणे गरजचे असून महाराष्ट्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ‘महाराष्ट्र इनोव्हेटस्-नेक्स्ट स्टेप’ या विषयावरील चर्चासत्रात फडणवीस बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, राज्य शासनाच्या इनोव्हेशन कौन्सिलचे सह अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, राष्ट्रीय इनोव्हेशन फाऊंडेशनचे अनिल गुप्ता, आय ए बी ए चे हरकेश मित्तल, डॉ. रघुनंदन राजामणी, राज्य शासनाच्या इनोव्हेशन कौन्सीलचे सदस्य सचिव डॉ. राजेंद्र जगदाळे आदी उपस्थित होते.