मांस कधी खायचं, कधी नाही यासाठी कॅलेंडर बनवा - उच्च न्यायालय
By admin | Published: April 5, 2017 06:14 PM2017-04-05T18:14:46+5:302017-04-05T18:16:04+5:30
सणउत्सवाच्या काळात मांसविक्रीवर बंदी घालण्यासाठी योग्य ती योजना तयार करा असं मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सांगितलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - सणउत्सवाच्या काळात मांसविक्रीवर बंदी घालण्यासाठी योग्य ती योजना तयार करा असं मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सांगितलं आहे.
मुंबई मटण विक्रेता असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनूप मेहता यांच्या खंडपिठाने सणउत्सवाच्या काळात मांसाहारावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारला योग्य ती योजना आखण्यास सांगितलं आहे. सणउत्सवादरम्यान कोणकोणत्या दिवशी मांस विक्रीवर बंदी असावी यासाठी सरकारने योजना आखावी असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
यासाठी सरकारने दिशानिर्देश तयार करावेत आणि कोणत्या दिवशी मांस विक्री बंद करायची आहे त्या तारखांची एक यादी तयार करावी अशी सूचना महाराष्ट्र सरकारला केली आहे.
काय आहे प्रकरण-
2015 मध्ये जैन धर्मियांच्या पर्युषण काळात चार दिवस कत्तलखाना आणि मांसविक्री बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला होता. या आदेशानंतर राजकीय वातावरण तापलं होतं आणि बराच गदारोळ झाला होता. त्यावेळी मुंबई मटण विक्रेता असोसिएशनने मांसविक्री बंदीच्या राज्य सरकार आणि पालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. ही बंदी सरकारने अचानक घातली असल्याचे तसेच त्याबाबत विक्रेत्यांना व लोकांनाही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप केला होता. 2015 मध्ये न्यायालयाने मांसविक्री बंदीच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली होती.