विद्यापीठातील शिक्षण पद्धतीत बदल करा!
By Admin | Published: July 6, 2015 02:24 AM2015-07-06T02:24:23+5:302015-07-06T02:24:23+5:30
विद्यापीठांमधील शिक्षण तसेच परीक्षा पद्धतीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का घसल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुणे : विद्यापीठांमधील शिक्षण तसेच परीक्षा पद्धतीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का घसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी बदलत्या काळानुसार आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करायला हवा, असे मत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
शनिवारी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात राज्यातील मराठी विद्यार्थी मागे पडल्याचे चित्र दिसून आले. यूपीएससी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न समजून घेण्यात आणि त्यावर अपेक्षित असणारे उत्तर लिहिण्यात हे विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना १७५० गुणांच्या लेखी परीक्षेची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करावी लागणार आहे. यूपीएससीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अबोली नरवणे हिनेसुद्धा लेखी परीक्षेत विचारले जाणारे मोठे प्रश्न समजावून घेऊन त्यांची उत्तरे शांतपणे लिहिण्यावर भर दिल्याचे सांगितले.
युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव म्हणाले, विद्यापीठातील शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धती सदोष असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना यूपीएससीची तयारी करता येत नाही. विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा विचार करायला लावणारा व चिकित्सक दृष्टीने पाहायला लावणारा हवा.
राज्यातील विद्यार्थी लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे विद्यापीठाच्या लेखी परीक्षेत आणि परीक्षेचे मूल्यांकन करण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा, असे स्टडी सर्कलचे संस्थापक डॉ. आनंद पाटील म्हणाले.