राज्यभर सरसकट दारुबंदी करा
By Admin | Published: June 14, 2015 02:39 AM2015-06-14T02:39:44+5:302015-06-14T02:39:44+5:30
चंद्रपूरमधील दारुबंदीविरोधात न्यायालयात गेलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे ‘लोकमत’शी बोलताना
राधाकृष्ण विखे : राज्यभरात समान धोरणाची मागणी
श्रीरामपूर (अहमदनगर) : चंद्रपूरमधील दारुबंदीविरोधात न्यायालयात गेलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी श्रीरामपूर येथे ‘लोकमत’शी बोलताना केवळ एखाद्या जिल्ह्यापुरती दारुबंदी न करता राज्यभरात सरसकट एकदाच दारुबंदी करा, अशी जाहीर भूमिका प्रथमच मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ते शनिवारी येथे आले होते. डॉ. केळकर समितीने शेतकरी आत्महत्येमागे दारूचे व्यसन हे एक कारण आहे. त्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, की वर्धा जिल्ह्यात फार वर्षांपासून संपूर्ण दारुबंदी करण्यात आली आहे. पण तेथेच सर्वाधिक दारुविक्री होते. आता युती सरकारने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी जाहीर केली आहे. हा
निर्णय पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा आहे. एखाददुसऱ्या जिल्ह्यात दारुबंदी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्याऐवजी सरसकट संपूर्ण राज्यात दारुबंदी झाली पाहिजे. आमचा कारखाना गेल्या ४० वर्षांपासून दारुनिर्मिती करतो. तिची चंद्रपूरसह राज्यभरात विक्री होते. त्यातून कारखान्यास आर्थिक उत्पन्न मिळते.
दारुबंदीचे स्वागतच
चंद्रपूरच्या दारुबंदीमुळे कारखान्याचा निश्चित आर्थिक तोटा होणार आहे, म्हणून विखे साखर कारखाना न्यायालयात गेला आहे. पण आम्ही दारुबंदीविरोधात नाही. दारुबंदीच्या निर्णयाचे मी स्वागतच करतो. पण राज्यभरात एकच कायदा व समान धोरण असले पाहिजे, असे विखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)