‘बारावी’ला संविधानिक शिक्षण अनिवार्य करा, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:50 AM2020-07-11T05:50:29+5:302020-07-11T05:51:14+5:30
इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील
पुणे : भारतीय राज्यघटनेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत याकरिता राज्यात बारावीच्या परीक्षांसाठी त्या-त्या भाषेमधून संविधानिक शिक्षणाचा ५० गुणांवर आधारित पेपर अनिवार्य करावा. शिक्षकांसाठी सांविधानिक मूल्यांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आखावा अशी विनंती करणारे पत्र विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
या तज्ज्ञ मंडळींमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी, डॉ. यशवंत मनोहर, विचारवंत प्रा. हरी नरके, प्रा. वामन केंद्रे, हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, प्रज्ञा दया पवार, शाहीर संभाजी भगत, सुषमा देशपांडे, सुभाष वारे, डॉ. महेश केळुस्कर, आनंद पटवर्धन आदींचा समावेश आहे.
इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील, यासाठी याची अंमलबजावणी करावी, असे पत्रा म्हटले आहे.
शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची माहिती देणारे धडे समाविष्ट केले जावेत. संविधान हा विषय काहीसा किचकट असल्याने तो कशा पद्धतीने शिकविला जावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायला हवे. नागरिकांचे सांविधानिक शिक्षणाबाबत प्रबोधन करणे हा यामागील हेतू आहे.
- प्रा. हरी नरके