दुर्घटनेची सखोल चौकशी करा
By admin | Published: May 11, 2015 03:14 AM2015-05-11T03:14:52+5:302015-05-11T03:14:52+5:30
आगीत मुंबई अग्निशमन दलाचे २ अधिकारी शहीद, २ अधिकारी गंभीर जखमी व १ अग्निशमन किरकोळ जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी चौकशी समिती नेमली आहे.
मुंबई : आगीत मुंबई अग्निशमन दलाचे २ अधिकारी शहीद, २ अधिकारी गंभीर जखमी व १ अग्निशमन किरकोळ जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी या घटनेची चौकशी करण्याकरिता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती घटनेचा अहवाल तीन आठवड्यांत आयुक्तांना सादर करणार आहे.
आग लागण्याचे कारण व आगीची माहिती मिळाल्यानंतर देण्यात आलेला प्रतिसाद, आग विझवताना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्रीची उपलब्धता कार्यान्वित करण्याच्या व्यवस्थेबाबतची माहिती, आगीबाबतची माहिती वेळेत विविध यंत्रणा तसेच प्रसारमाध्यमे इत्यादींना उपलब्ध करणे या मुद्द्यांची समिती चौकशी करेल. त्यानंतर आपला अहवाल आयुक्तांना सादर करेल. (प्रतिनिधी)
------------
राज्य सरकार कुटुंबीयांच्या पाठीशी
काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान शहीद झाल्यानंतर या भीषण आगीची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत.
शिवाय जवानांच्या कुटुंबीयांना सर्व मदत करण्याची ग्वाही देतानाच देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकार जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असेही ते म्हणाले.