विकास आराखडा सर्वसमावेशक करा

By admin | Published: June 27, 2016 01:50 AM2016-06-27T01:50:56+5:302016-06-27T01:50:56+5:30

मुंबई महापालिकेने सादर केलेला विकास आराखडा सर्वसमावेशक नाही.

Make development plan comprehensive | विकास आराखडा सर्वसमावेशक करा

विकास आराखडा सर्वसमावेशक करा

Next


मुंबई : मुंबई महापालिकेने सादर केलेला विकास आराखडा सर्वसमावेशक नाही. महापालिकेच्या बैठकीत विकास आराखड्यावरून यापूर्वी अनेकदा वादंग माजले आहेत. आराखड्यात कोस्टल रोड, प्रार्थना स्थळे, कोळीवाडे आणि गावठाणांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नाही. उद्याने, मोकळे भूखंड आणि मैदान याबाबत पालिकेने मांडलेले धोरण सुस्पष्ट नाही. विशेषत: आराखड्यावर पालिकेने नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या असल्या तरी विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांना समजेल; अशा भाषेत नाही. परिणामी, सर्वसामान्यांना समजेल अशा रीतीने पालिकेने आराखड्याचे विश्लेषण करावे आणि मुंबईसह कुर्ला पश्चिमेकडील गावठाणांसह येथील नागरी सेवा-सुविधा सोडविण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी मुंबईकरांनी केली. निमित्त होते ते ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे.
२३ जून रोजी रात्री ७.३० वाजता कुर्ला पश्चिमेकडील हॉलीक्रॉस चर्च येथे ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वॉचडॉग फाउंडेशन, बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन, साऊल टीम अ‍ॅण्ड गार्डीयन्स युनायटेड आणि यूएसडब्ल्यूए या संघटनांतर्फे आयोजित या कार्यक्रमाला अ‍ॅड. व्हिविन डिसुजा आणि स्थानिक रहिवाशांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी या वेळी मुंबईच्या विकास आरखड्यासंबंधी विशेष सादरीकरण केले. सादरीकरणात पिमेंटा यांनी कोळीवाडे, गावठाण आणि रस्त्यांसह उद्यान व मैदानांबाबत महापालिका प्रशासनाने विकास आराखड्यात केलेल्या चुकांचा पाढा वाचला; शिवाय कुर्ला येथील प्रार्थना स्थळे आणि ख्रिश्चन गाव आदींचा विकास आराखड्यात करण्यात आलेला समावेश कसा चुकीचा आहे याचे विश्लेषण उपस्थितांसमोर केले.
>कोळीवाडे, गावठाणं याबाबत विकास आराखड्यातून अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. मुंबई महापालिका विकास आराखड्याबाबत सर्वसामान्यांना अंधारात ठेवत आहे. विकास आराखड्यात प्रार्थना स्थळांबाबत पालिका प्रशासन आवश्यक माहिती देत नाही.
आराखड्यातील आरक्षणाच्या मुद्द्यांवर तर घोळात घोळ असून, कोस्टल रोड किंवा अन्य प्रकल्पांबाबतही आराखडा सविस्तर माहिती देत नाही. परिणामी, महापालिकेने आराखडा अंतिम करताना सर्वसामान्य मुंबईकरांना किमान समजेल, अशा भाषेत तरी माहिती द्यावी; आणि सूचना-हरकती मांडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. अन्यथा भविष्यात कोळीवाडे-गावठाणे किंवा उद्याने-मोकळ्या जागांवर संक्रात आल्याशिवाय राहणार नाही, असेही पिमेंटा यांनी आवर्जून नमूद केले.
मुंबई महापालिकेने सादर केलेल्या विकास आराखड्यात असंख्य चुका आहेत. उद्याने आणि मैदानांचे आरक्षण चुकले आहे. सेवा रस्त्यासह कोळीवाडे, गावठाण्यांसंदर्भातील गंभीर चुका विकास आराखड्यात करण्यात आलेल्या आहेत. भूमिपुत्रांचा तर विचारच केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे विकास आराखडा सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत मांडणे गरजेचे होते. परंतु पालिकेने अत्यंत शास्त्रीय किंवा सर्वसामान्यांना समजणार नाही, अशा भाषेत विकास आराखडा मांडला आहे, असे गॉडफ्रे पिमेंटा या वेळी म्हणाले.
>मिठीलगतच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. विमानतळ प्राधिकरणालगतच्या जरीमरी, संदेश नगर आणि क्रांती नगर येथील झोपड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. मगन नथुराम मार्ग, कुर्ला-अंधेरी रस्त्यावरील कमानी ते साकीनाका या मार्गाचा रुंदीकरणाचा प्रश्न सुटलेला नाही. मिठीसह नाल्यांची साफसफाई पावसाळा सुरू झाला तरी झालेली नाही. - राकेश पाटील

Web Title: Make development plan comprehensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.