गोवा भ्रष्टाचारमुक्त करू - अरविंद केजरीवाल
By admin | Published: May 23, 2016 04:35 AM2016-05-23T04:35:56+5:302016-05-23T04:35:56+5:30
गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही, ते एक आंदोलन आहे. गोवा भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. गोव्यातील भाजपा सरकारने काँग्रेसची भ्रष्ट राजवटच पुढे चालू ठेवली आहे.
पणजी : गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही, ते एक आंदोलन आहे. गोवा भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. गोव्यातील भाजपा सरकारने काँग्रेसची भ्रष्ट राजवटच पुढे चालू ठेवली आहे. भ्रष्टाचार, कॅसिनो आणि खाणींच्या प्रश्नांबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे केली.
गोवा भ्रष्टाचारमुक्त करण्याची ग्वाही त्यांनी दिली. येथील कांपाल मैदानावर केजरीवाल यांची जाहीर सभा झाली. ‘आप’तर्फे सहा महिने येथे जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. ४० मतदारसंघांत आपचे उमेदवार उभे केले जातील, असे पक्षाने यापूर्वी जाहीर केलेले आहे. सर्व मतदारसंघांत पक्षाचे समन्वयक जाहीर झालेले आहेत. हेल्पलाइन क्रमांकही लोकांना देण्यात आलेला आहे. मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटींवर पक्षाने भर दिलेला आहे. त्यासाठी दारोदार पक्षाचे कार्यकर्ते जात आहेत. या सर्वांचा परिणाम सभेच्या लक्षणीय उपस्थितीत जाणवला.
केजरीवाल म्हणाले, दिल्ली निवडणुकीत ते माझी टिंगल करत नव्हते तर आम आदमीच्या ताकदीची टिंगल करत होते. या आम आदमीच्या मनात भ्रष्टाचाराच्या विरोधात असंतोष धगधगत होता. तो निकालातून दिसून आला, गोव्यातही हे होऊ शकते.
स्वत:च्या मंत्र्याला लाच घेतली म्हणून नव्हे, तर लाच मागितली म्हणून आम्ही सीबीआयच्या स्वाधीन केले, देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले, असे त्यांनी सांगितले. सभेला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.