...तर मेक इन इंडिया फेल ठरेल
By admin | Published: February 11, 2016 02:16 AM2016-02-11T02:16:38+5:302016-02-11T02:16:38+5:30
सरकारने २ लाख किंवा त्याहून अधिक सोने खरेदीवर लादलेली पॅन कार्ड सक्ती मागे घेतली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेला ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प यशस्वी होणार नाही, असा
मुंबई : सरकारने २ लाख किंवा त्याहून अधिक सोने खरेदीवर लादलेली पॅन कार्ड सक्ती मागे घेतली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेला ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प यशस्वी होणार नाही, असा इशारा आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने दिला आहे. पॅन कार्ड सक्तीविरोधात फेडरेशनने बुधवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. त्याला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
संपाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेडरेशनने पुन्हा एकदा सरकारकडे चर्चेची मागणी केली. फेडरेशनचे संचालक अशोक मिनावाला म्हणाले की, केवळ २ लाख रुपयांसाठी पॅन कार्ड सक्ती करणाऱ्या सरकारने खरेदी मर्यादा वाढवून १० लाख रुपये करावी; टप्प्याटप्प्याने पॅन कार्डधारकांचे प्रमाण वाढवल्यानंतर खरेदी मर्यादेत कपात करावी. केवळ २२ कोटी ३० लाख लोकांजवळ पॅन कार्ड आहे. अशा परिस्थितीत केवळ २ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सोने खरेदीवर पॅन कार्ड सक्ती लादल्यास सराफा उद्योग उद्ध्वस्त होईल. पॅन कार्ड सक्तीचा फटका देशातील ३ लाख सराफांसोबतच १ कोटी कारागिरांना बसण्याचा दावा फेडरेशनने केला आहे. सराफा उद्योगातील ७० टक्के ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे पॅन कार्ड सक्ती केल्यामुळे हा ग्राहकवर्ग सराफा बाजारापासून दुरावू लागल्याची भीती फेडरेशनने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
बंदला संमिश्र प्रतिसाद
आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी फेडरेशनने पुकारलेल्या संपात देशातील २००हून अधिक संघटनांनी सामील होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनने या संपात सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. याउलट महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाने संपाला पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे काही ठिकाणे दुकाने बंद, तर काही ठिकाणी उघडी असल्याचे निदर्शनास आले.