‘मेक इन इंडिया’ १३ फेब्रुवारीपासून
By Admin | Published: February 9, 2016 01:39 AM2016-02-09T01:39:07+5:302016-02-09T01:39:07+5:30
जगातील ६० देशांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी, मोठे गुंतवणूकदार, १५ केंद्रीय मंत्री यांच्यासह १७ राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांचा सहभाग असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन
मुंबई : जगातील ६० देशांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी, मोठे गुंतवणूकदार, १५ केंद्रीय मंत्री यांच्यासह १७ राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांचा सहभाग असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला मुंबईत होत आहे. १८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाणिज आणि व्यापार राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेअंतर्गत हा पहिला सप्ताह आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. त्याचे उद्घाटन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील ‘मेक इन इंडिया सेंटर’मध्ये होईल.
उद्घाटनानंतर अनेक चर्चासत्रे, कार्यक्र म आणि उद्योग विश्वातील प्रतिनिधींबरोबर संवाद होणार आहे. विविध राज्यांची दालने असतील. देशांतर्गत कंपन्यांचे ८ हजार सीईओ सहभागी होतील. तब्बल २३ चर्चासत्र होणार आहेत. या सप्ताहानिमित्त गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य, प्राचीन संस्कृती प्रदर्शित केली जाईल. ‘मेक इन इंडिया’ सेंटरमध्ये महाराष्ट्राचे वेगळे पॅव्हेलियन असणार आहे. त्यात महाराष्ट्राची परंपरा, पर्यटन क्षेत्रांची माहिती, सिनेमा थिएटर, आॅटोमोबाईल आणि स्मार्ट सिटी असे वेगवेगळे विभाग असतील. (विशेष प्रतिनिधी)
‘मेक इन इंडिया सप्ताह’मध्ये महाराष्ट्राशी संबंधित कार्यक्रम
१४ फेब्रुवारी -महाराष्ट्र इनोव्हेशन चर्चासत्र
टेक्स्टाईल इंडस्ट्री इन महाराष्ट्र चर्चासत्र
महाराष्ट्र एमएसएमई चर्चासत्र
महाराष्ट्र नाईट
१५ फेब्रुवारी -महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट चर्चासत्र
मेक इन मुंबई चर्चासत्र
नेव्ही बँड
१६ फेब्रुवारी - दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसंबंधी चर्चासत्र
बिझनेस टू बिझनेस व बिझनेस टू गव्हर्नमेंट मिटींग
सांस्कृतिक कार्यक्र म
१७ फेब्रुवारी - बिझनेस टू बिझनेस व बिझनेस टू गव्हर्नमेंट बैठक
महाराष्ट्र टेक्स्टाईल सेमिनार