दहा वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य
By admin | Published: January 7, 2015 02:20 AM2015-01-07T02:20:06+5:302015-01-07T02:20:06+5:30
भारताने मंगळ यान मोहीम पहिल्याच प्रयत्नात सफल केली आहे. आपला देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वळत असून, पुढील १० वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य आहे.
मुंबई : भारताने मंगळ यान मोहीम पहिल्याच प्रयत्नात सफल केली आहे. आपला देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वळत असून, पुढील १० वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य आहे. हे प्रत्यक्षात आल्यास जपानसह अमेरिकाही भारताकडून उत्पादने आयात करेल, असा विश्वास संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मेक इन इंडिया या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. रवी पंडित, प्रमोद चौधरी यात सहभागी झाले होते.
भारतातील बहुतांश कंपन्या स्वार्थी भावनेने काम करतात. भारतातील कंपन्यांनीही सिंगापूर, कोरियाप्रमाणे एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असेही भटकर म्हणाले. स्वतंत्र झालो तेव्हा आपल्याकडे गरिबी, रोजगार या समस्या होत्या. ६0 वर्षांनंतरही या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. लायसन्स राज नष्ट करून राजीव गांधी यांनी भारतात संगणकाची बिजे रोवली. त्यामुळे सॉफ्टवेअर जगतात भारताची ओळख असल्याचे भटकर यांनी या वेळी नमूद केले. जगात सर्वांत मोठ्या पायाभूत सुविधा भारतात आहेत. संशोधन आणि विकास हे भारताचे माहेरघर आहे. मेक इन इंडिया करणे भारतापुढे आव्हान असल्याचे ते म्हणाले. केएचआयटी कंपनीचे प्रमुख रवी पंडित यांनी मेक इन इंडिया होण्यासाठी देशापुढे रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण याचे प्रमुख आव्हान असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये विद्वान होण्यासाठी इतिहासातील विज्ञानाचे धडे घेणे हाच सर्वांत चांगला पर्याय असल्याचे मत भटकर यांनी या परिसंवादात व्यक्त केले.
नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे वेळोवेळी माहिती देण्याचे उद्दिष्ट - मेहरा
मुंबई - देशाची आर्थिक घडी बसविता यावी आणि समाजाकडून या आर्थिक रचनेला पूरक असा पाठिंबा मिळावा यादृष्टीने वेळोवेळी उपयुक्त माहिती पुरविण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशन या संघटनेचे प्रमुख अजय मेहरा यांनी सांगितले. इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये परिसंवादामध्ये ते बोलत होते. या वेळी मेहरा यांनी कृषीविषयक माहितीचे वापरकर्ते, राष्ट्रीय सांख्यिकी पद्धतीचे मूल्यांकन, सांख्यिकीसंदर्भातील विधेयके, पार्श्वभूमी आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशनच्या वाटचालीतील मैलाचे दगड ठरतील, अशा गोष्टींची सविस्तर मांडणी केली. कृषीविषयक तसेच अन्य क्षेत्रांविषयीचा गाभा ठरतील अशा महत्त्वाच्या गोष्टी ही संस्था निश्चित करते, असेही ते म्हणाले.