"बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा", उद्धव ठाकरेंना टोला
By बाळकृष्ण परब | Published: January 27, 2021 05:52 PM2021-01-27T17:52:39+5:302021-01-27T17:55:57+5:30
Maharashtra-Karnatak Border Issue : बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु...
मुंबई - बेळगाव सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भाग हा केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बेळगाव म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या विधानाची भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे.
आपल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा.
दरम्यान, बेळगाव सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले होते. बेळगाव सीमा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यानं केंद्र सरकारनं संबंधित भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारनं बेळगावचं नामकरण बेलगाम करून तिथे बेलगामपणे अत्याचार सुरू केले आहेत. याविरोधात आपण पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कर्नाटकात असलेलं बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू आहे. या विषयावरील 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मोठे नेते उपस्थित होते.