कर्जमाफीचा निर्णय घ्या; अन्यथा दूध, भाजीपाला रोखू - राजू शेट्टी
By Admin | Published: May 30, 2017 10:06 PM2017-05-30T22:06:57+5:302017-05-30T22:06:57+5:30
ज्य सरकारने शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 दिवसात घ्यावा, अन्यथा 1 जुलैपासून मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो सिटीचा दूध आणि भाजीपाला रोखू असा इशारा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - राज्य सरकारने शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 दिवसात घ्यावा, अन्यथा 1 जुलैपासून मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो सिटीचा दूध आणि भाजीपाला रोखू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
मुंबईत आत्मक्लेश यात्रेचा मंगळवारी समारोप झाला. यावेळी 6.50 लाख शेतक-यांचे कर्जमुक्तीचे अर्ज राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी तुमच्या या सर्व मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहचवू तसेच कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे मागण्या सादर करू अशी ग्वाही यावेळी राज्यपालांनी दिली.
परळ ते राणीचा बाग अशी पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी तसेच शेतक-यांनी आपला सहभाग दर्शविला. मुंबईत प्रथमच शेतक-यांचा विक्रमी मोर्चा निघाला होता. सगळीकडे कर्जमुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले की, गेल्या 9 दिवसांपासून आम्ही पुण्याहून चालत उन्हाचे चटके खात आहोत. या 9 दिवसांत एकाही मंत्र्याने अथवा अधिका-यांने विचारपूस केली नाही. तुम्हाला याची लाज का वाटली नाही? आम्ही काही गुन्हेगार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कधीही मैदानात या माझी कुस्ती करण्याची तयारी आहे. मुंबईत येऊन मी तुम्हाला आव्हान देतो आहे. दोन हात करण्याची माझी कधीही तयारी आहे. मी डगमगणारा नेता नाही. मला लाल दिव्याची कधीच आस नाही. लाल दिवा घ्यायचा असता तर दहा वर्षापुर्वीच मी घेतला असता, मी लाल दिव्याचा लालची माणूस नाही. मला फक्त शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. सत्तेत रहायचं का नाही हे शेतक-यांनीच ठरवावे. त्यावर सर्व शेतक-यांनी हात उंचावून सत्तेतून बाहेर पडा, अशी मागणी केली.
यावेळी प्रा. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले,सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, माणिक कदम, देवेंद्र भुयार, राहूल मोरे, विकास देशमुख, रसिकाताई ढगे, राजेंद्र ढवाण, सुरेश गवळी, प्रल्हाद इंगोले, दामू इंगोले, सागर संभूशेटे, सागर चिपरगे, सचिन नलवडे आदी उपस्थित होते.