कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवणार
By Admin | Published: April 1, 2016 01:33 AM2016-04-01T01:33:33+5:302016-04-01T01:33:33+5:30
भारतीय लष्करात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र फारच कमी आहेत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र बनविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, तोपर्यंत ही
पुणे : भारतीय लष्करात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र फारच कमी आहेत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र बनविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, तोपर्यंत ही क्षेपणास्त्रे आयात करण्यात येणार आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीप्रदान समारंभात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ब्रह्मोसच्या नव्या रेजिमेंट येत्या काही दिवसांत दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय रशियन हेलिकॉप्टर्सदेखील लवकरच सामील होणार आहेत. यामुळे लष्कराची ताकद वाढेल, असे सांगून पर्रिकर यांनी पाकिस्तानी समितीचा पठाणकोट दौरा, लष्करातील मनुष्यबळ कमी करणे, चीन-भारत संबंध अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला.
पर्रिकर म्हणाले, ‘पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या समितीला पाहणी करण्याची परवानगी दिली होती. हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) असून, त्यावर तपास सुरू आहे. एनआयएने पाकिस्तानच्या पथकाला पठाणकोटला तपास करण्याची अनुमती दिली आहे. याचा अर्थ, त्यांचा या घटनेशी काहीतरी संबंध नक्कीच आहे. मात्र, अद्याप तपास पूर्ण झाला नसून, यावर इतक्यात भाष्य करणे योग्य ठरणार नाही.’
लष्करात ज्या ठिकाणी आवश्यकता नाही, त्या ठिकाणी मनुष्यबळ कमी करण्यावर विचार सुरू आहे, तसेच तीनही दलांचा खर्च कमी करून जवानांच्या क्षमतेत वाढ करावी,’ अशी सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चीनमधून घुसखोरी नाही!
चीनचे सैन्य भारतीय सीमेत घुसल्याच्या बातमीचे पर्रिकर यांनी खंडन केले. भारत आणि चीनची सीमारेषा स्पष्ट नसल्यामुळे आपले सैनिक चीनमध्ये व त्यांचे सैनिक आपल्या हद्दीत येतात, याला घुसखोरी म्हणता येणार नाही.
सीमा ओलांडल्यास सामंजस्याने या तुकड्या पुन्हा निघून जातात. भारतीय सैन्याचे जवानदेखील अनेक वेळा चीनच्या सीमेमध्ये प्रवेश करतात, असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.