महाराष्ट्राला बनवू जगातील सर्वोत्कृष्ट राज्य
By admin | Published: August 16, 2015 02:53 AM2015-08-16T02:53:55+5:302015-08-16T02:53:55+5:30
राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या
- मुख्यमंत्र्यांचा निर्धार
मुंबई : राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणत रोजगाराच्या संधी वाढवतानाच शेतकरीही जगला पाहिजे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नदाता असणारा शेतकरीच संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांतील, तर विदर्भातील ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करण्यात येईल. यात शेतकऱ्यांना ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोने गहू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ७ लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संकटाच्या काळात बळीराजा उपाशी राहू नये, यासाठी ही योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पारदर्शक कारभारासाठी सरकारने खरेदीची नवी पध्दत स्विकारली आहे. तसेच लोकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने सेवा हमी विधेयकही संमत करण्यात आले आहे. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ८५ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या. या वेबपोर्टलवर आता महसूली मुख्यालयांचाही समावेश केला जाणार असून आज त्याचा शुभारंभ होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. मुंबईतील इंदू मीलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र शासनाकडून जागा मिळाली आहे. बाबासाहेबांचे लंडनस्थित घर विकत घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. शासन हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरा करेल, असे ते म्हणाले.