‘मेक इन इंडिया’ खेड्यातून व्हावे
By admin | Published: May 16, 2016 02:16 AM2016-05-16T02:16:34+5:302016-05-16T02:16:34+5:30
किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले
अहमदनगर : महाराष्ट्राला कर्तृत्ववान उद्योजकांची मोठी परंपरा आहे़ बदलत्या काळानुसार जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रोजगार निर्मितीचे विकेंद्रीकरण करावे लागेल. परदेशी उद्योजकांवर अवलंबून न राहता जनतेच्या गरजा लक्षात घेऊन किफायतशीर दरातील उत्पादनांची निर्मिती केली तर खेड्यापाड्यातूनही ‘मेक इन इंडिया’चा जन्म होईल, असे प्रतिपादन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी केले.
‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीने उद्योग, व्यवसायातील कर्तृत्ववान व्यक्तींचा वेध घेणाऱ्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली आहे. शनिवारी एका समारंभात या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन होऊन आयकॉन्सचा गौरव करण्यात आला.
फिरोदिया म्हणाले, पाठ्यपुस्तकात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेख येतो़ उद्योजकांची महती मात्र कधीच आलेली दिसत नाही़
राजकारणी कलावंत यांच्याइतकेच उद्योजकांनाही महत्त्व द्यायला हवे.
काळाच्या गतीने धावा : राजेंद्र दर्डा
काळासोबत धावण्यात मागे राहिलेल्या अनेक जागतिक कंपन्या आता दिसत नाहीत. त्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांनी काळाबरोबर धावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले.
ते म्हणाले, स्वत:चे इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या कंपन्या केवळ कल्पकतेच्या आधारे आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. स्वत:ची एकही टॅक्सी नसलेली उबर जगातील सर्वांत मोठी टॅक्सी आॅपरेटर कंपनी आहे. एअर बी अॅण्ड बी अर्थात ब्रेड अॅण्ड ब्रेकफास्ट या कंपनीकडे हॉटेलमधील एकही रुम नाही, पण हॉटेलमधल्या सर्वांत जास्त रुम विकणारी ही सर्वांत मोठी कंपनी आहे. ‘लोकमत’ या बदलांची माहिती वाचकांपर्यंत दररोज पोहोचवत आहे.
वृत्तपत्राचे काम हे केवळ बातम्या देणे आणि मनोरंजन करण्यापुरतेच सीमित नाही. समाजाच्या सुख, दु:खात समरस होऊन समाजाचा सोबती बनावे, ही ‘लोकमत’ची प्रारंभीपासूनची भूमिका आहे.
>नवनवीन संकल्पना हेच ‘लोकमत’चे वेगळेपण : विखे
‘लोकमत’ने सतत नवनवीन संकल्पना राबवून सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. त्यामुळेच माध्यमक्षेत्रात या वृत्तसमूहाचे वेगळेपण व लौकिक आहे. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी
आहे, असे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
यांनी काढले.
प्रेरणादायी
उपक्रम : शिंदे
गृहराज्यमंत्री राम शिंदे म्हणाले, ज्यांनी आयुष्यात संघर्ष करत उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले़, त्यांची ‘लोकमत’ने दखल घेत त्यांचा गौरव केला़ हा उपक्रम प्रेरणादायी आहे.